कोल्हापूर - एफआरपी दोन टप्प्यात देण्याचे आदेश राज्य सरकारने काढल्यानंतर रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत आक्रमक झाले आहेत. सरकारच्या या निर्णयाविरोधात संपूर्ण राज्यभर आंदोलन उभे केले जाणार आहे. ठीक ठिकाणी सभा घेऊन शेतकऱ्यांना जागे करण्याचे काम केले जाणार आहे, अशी माहिती रयत शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिली. ते आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा - Panchganga Pollution : पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर; लाखो मासे पुन्हा मृत्युमुखी
यावेळी बोलताना सदाभाऊ यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ज्यावेळी राजू शेट्टी युती सरकारसोबत होते त्यावेळी पाठिंबा दिल्याने त्यांनी आत्मक्लेश केला होता. मात्र, आता राजू शेट्टी आत्मक्लेष कधी करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला? शिवाय खासदारकीसाठी डबल ढोलकी वाजवणे राजू शेट्टी यांनी बंद करावे, असे देखील सदाभाऊ खोत म्हणाले.
१ एप्रिलला राज्यभर आंदोलन
राज्य शासनाने नुकतेच ऊस दराबाबत एक आदेश काढला आहे. त्यामध्ये अप्रत्यक्षपणे एफआरपीचे दोन तुकडे होणार आहेत. त्यांच्या या आदेशानंतर आता शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या संघटना राज्य सरकार विरोधात आक्रमक झाल्या आहेत. ऊस नियत्रंण आदेश 1966 हे केंद्र सरकारचा असून या आदेशानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्याला ऊस कारखान्यास गेल्यानंतर एक रकमी एफआरपी दिली पाहिजे, असे कायद्यात स्पष्ट लिहिले असताना महा विकास आघाडी सरकारने मात्र या आदेशाची पायमल्ली केल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
महा विकास आघाडी सरकारने एफआरपी 2 हफ्त्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय शेतकऱ्यांना मान्य नाही असे म्हणत रयत क्रांती संघटना या सरकारच्या विरोधात आवाज उठवणार आहे. 1 मार्चला राज्यभर सरकारच्या निर्णयाच्या आदेशाची होळी करण्यात येणार आहे. तसेच, राज्यभर जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे आणि एप्रिलमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पहिला मेळावा कोल्हापूर जिल्ह्यात घेणार असल्याचे खोत यांनी जाहीर केले आहे.