कोल्हापूर - महाविकास आघाडी स्थापन करताना ( Mahavikas Aghadi Government ) आम्ही देखील अनेक उंभरटे झिजवले आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर आमच्यासारख्या छोट्या पक्षांना डावललं जात असल्याची खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ( Raju Shetty On MVA Government ) यांनी आज व्यक्त केली आहे. ते आज कोल्हापुरात बोलत होते. गेल्या दोन दिवसांपूर्वी माजी खासदार राजू शेट्टी यांनी शरद पवार यांना पत्र लिहीत महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून होत असलेल्या अनेक कामांविषयी नाराजी आणि छोट्या मित्रपक्षांना डावलत असल्याची खंत व्यक्त करून दाखवली होती. शेतकरी व सर्वसामान्यांच्या विश्वासाला तडा जाईल, असे अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. यात वेळीच बदल केले नाहीत, तर सत्तेचा डोलारा कोसळण्यास वेळ लागणार नाही, असे देखील पत्रात लिहिले होते.
'आम्ही ही उंभरटे झिजवले' -
महाविकास आघाडी स्थापन करण्यात आम्ही देखील अनेक उंबरठे झिजवले आहेत. मला देखील या सरकारमध्ये बोलण्याचा अधिकार आहे. यामुळे मी हे पत्र लिहिले असून शरद पवारांकडून अद्याप याचे काही उत्तर मिळाले नसल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. तसेच महाविकास आघाडीमध्ये राहायचे की नाही, याबाबत सध्या तरी कोणताच विचार नाही. मात्र, योग्य वेळ आल्यावर निर्णय घेतला जाईल, असे देखील राजू शेट्टी म्हणाले. तसेच किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीस परवानगी देत शेतकऱ्याला बदनाम केले आहे. वाईन विक्री ही राज्यात पूर्वीपासून सुरूच होती. मात्र, आता त्याला नवीन धोरण म्हणत किराणामालाच्या दुकानातून विक्रीची परवानगी देत आहेत. यामुळे वाईनचा खप वाढेल, असे तरी मला वाटत नाही. मात्र, या सर्वांमुळे शेतकरी नाहक बदनाम होत असल्याचे ते म्हणाले.
राजू शेट्टींनी लिहिले होते शरद पवारांना पत्र -
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या गेल्या 2 वर्षाच्या कारभाराविषयी खासदार शरद पवार यांना पत्र लिहिले होते. या पत्रात खासदार राजू शेट्टी यांनी अनेक आठवणींना उजाळा देत, काही निर्णय घेत असताना महाविकास आघाडी सोबत असलेल्या छोट्या मित्र पक्षांना विसरल्याचेदेखील खंत व्यक्त केली होती. तसेच शरद पवारांनी साताऱ्यात केलेल्या पाऊसातील भाषणाचे आठवण करून देत. वाईट काळात अनेक जण शरद पवारांची साथ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेल्यानंतर सोबत फक्त शेतकरी उभा होता. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर तुमच्या अथक परिश्रमामुळे महाविकास आघाडीची निर्मिती झाली मी स्वत: त्याचा साक्षीदार आहे. मात्र, त्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी सोडली तर काहीच केले नसल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. तसेच महाविकास धर्मनिरपेक्ष आघाडीला पाठिंबा देणारे समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडी, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी पक्ष, लोकभारती व इतर छोटे मोठे पक्ष यांना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते आजकाल कवडीचीही किंमत देत नाहीत. महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून या छोट्या पक्षाबरोबर एकही बैठक झालेले नाही. मात्र त्याच काळामध्ये काही धोरणात्मक निर्णय घेतले गेले ते घेत असताना ज्या विषयावर या छोट्या पक्षांनी हयातभर संघर्ष केला, त्यांचे मतही विचारात घेतले नाही, असे देखील पत्रात नमूद केले होते.