कोल्हापूर - कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरू आहेत. स्मशानभूमी येथील होणारी लोकांची गर्दी कमी करण्यासाठी आणि कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कारासाठी शवदाहिनी वापर करण्यात यावा यासाठी महापौर निलोफर आजरेकर यांनी तातडीने शवदाहिनी सुरू करणेबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. त्यानुसार आज लिकेज दुरुस्ती करून स्मशानभूमी येथील शवदाहिनी सुरू करण्यात आली.
महापौर निलोफर आजरेकर यांनी शवदाहिनीबाबत मागील आठवड्यात बैठक घेऊन सदरची शवदाहिनी लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरातील व शहराबाहेरील टेक्नीशियनला जागेवर बोलवून सदरची शवदाहिनी कुठे लिकेज आहेत याची तपासणी करुन ती तातडीने दुरुस्त करुन घेण्यात आली. पंचगंगा स्मशानभूमीकडे एकूण 42 बेड उपलब्ध असून त्यापैकी 20 बेडचे सिव्हील वर्कचे काम सध्या सुरू आहे. या बेडपैकी 7 बेड हे कोरोना रुग्ण मयत झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी उपलब्ध केले आहे. शवदाहिनीध्ये लिकेज असल्यामुळे ती सुरू करण्यात आलेली नव्हती. यासाठी बडोदा येथील अल्फा गॅस एजन्सी कंपनीचे टेक्नीशियन कोल्हापूरला आले होते. आता यापुढे या शवदाहिनीमुळे लोकांची होणारी गर्दी कमी होण्यास आणि कोविड19 मुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यास मदत होणार आहे.