कोल्हापूर- 'जगात कोरोना वगैरे काही नाही.. मास्क काढा..! तुम्ही आमची पावडर करायला लागलाय काय? असा प्रचार करणाऱ्या तरुणाला जुना राजवाडा पोलीस ठाण्यात पोलिसांनी खाक्या दाखवत वठणीवर आणले आहे. सुहास पाटील असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याने फेसबुक लाईव्ह करत कोल्हापूर महानगरपालिकेची ऑक्सिजन बस रोखली. तसेच लोकांना मास्क न वापरण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यानंतर कोरोना महामारीकाळात चुकीच्या अफवा पसरवणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी कारवाई करत वठणीवर आणला आहे. या प्रकरणी सुहास पाटील या तरुणावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सुहास पाटील हा गेल्या काही दिवसांपासून शहरात आपल्या मित्रांसोबत मास्क न वापरता फिरत होता. तसेच शहरातील स्टेशन रोड, महाद्वार रोड या परिसरात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मास्क घालणाऱ्या व्यक्तीजवळ जाऊन मास्क काढा, कोरोना वगैरे काही नाही. कोरोना आपली पावडर करत आहेत, असा अपप्रचार सुरू केला होता. तसेच अनेक हॉस्पिटलच्या दारात जाऊन कर्मचाऱ्यांशीही त्याने वाईट वर्तणूक केल्याचा प्रकार समोर आला होता. त्याच्या या कृत्याचे व्हिडिओ तो स्वत:च सोशल मीडियावर व्हायरल करत होता.
केएमटीची अडवली होती ऑक्सिजन बस -
या प्रकरणाची जुना राजवाडा पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी या तरुणाचा शोध घेतला. हा तरुण क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे राहत असल्याचे समोर आले. दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिकेची केएमटी ऑक्सिजन सेवा करणारी बस पाटील याने एका मार्गावर अडवली होती. तसेच त्यातील कर्मचाऱ्यांचा मास्क खाली ओढण्याचा प्रयत्न केला. बस थांबवून कोरोना वगैरे नाही असा प्रचार त्याने केला होता. त्यानंतर केएमटी प्रशासनाच्यावतीने अशोक शंकर खाडे यांनी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून सुहास पाटील वर गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलिसी खाक्या दाखवताच मास्क घालण्याचे आवाहन-
या प्रकरणी पोलिसांनी सुहास पाटील याला ताब्यात घेऊन कारवाई केली. यावेळी कोरोना महामारीबाबत जनतेमध्ये चुकीचा संदेश पसरवत असल्याच्या कारणाने पोलिसांनी त्याला खाकी वर्दीचा धाक दाखवला. त्यानंतर वठणीवर आलेल्या सुहास पाटील याने स्वत: मास्क परिधान करत त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेले आवाहन चुकीचे असल्याची कबुली दिली. तसेच सर्वानी मास्क वापरून कोरोनापासून बचाव करावा असे आवाहन पोलीस ठाण्यातून केले आहे.