कोल्हापूर- आपली मुले मोठा अधिकारी व्हावा, मोठा साहेब व्हावा, अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. फाटक्या संसारातून हातभार बाप काबाडकष्ट करत मुलांचे शिक्षण पूर्ण करतो. त्याच आई-बापाला वंदन करून आजची शिवजयंती सह्याद्री प्रतिष्ठान मोठी मोलाची बनवली. आई-वडिलांच्या पायांचे मुलांनी पूजन करून त्याच्या डोक्यावर फुलांची उधळण केली. रोज अभ्यास करेन, अशी शपथ घेत आई-वडिलांच्या काबाडकष्टाचे डोळे मिटून स्मरण केले. सर्व आठवून भावनिक झालेल्या अन् डबलेल्या डोळ्यांनी त्यांच्या हाताची मिठी आई-वडिलांभोवती घट्ट झाली. निमित्त होते सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित 'छत्रपती सप्ताह' अंतर्गतआई-वडिलांच्या पाद्यपूजन कार्यक्रमाचे.
खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली काशिलिंग मंदिर येथील कसबा बावडा शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण केंद्रात कार्यक्रम झाला. आई-वडील म्हणजे संस्कारांचे विद्यापीठ. त्यांच्यावर नितांत प्रेम करण्यासाठी खास दिवस लागत नाही. काही मुले मोठी झाल्यावर आई-वडिलांना अंतर देतात. सोशल मीडियाच्या जमान्यात ही दरी वाढू नये व मुला-मुलींनी आई-वडिलांचा सन्मान करावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी नऊ वाजता पालक वर्ग केंद्रात हजर होता. आचार्य दत्तात्रय पाटील व अविनाश पाटील यांनी आयुष्यातील आई-वडिलांचे महत्त्व स्पष्ट केले, त्यांच्या सूचनेनुसार मुला-मुलींनी पालकांचे पाद्य पूजन केले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत साळोखे यांनी आचार्य पाटील, शिवाजी कागीलकर यांनी श्री. पाटील, तर प्रशिक्षक प्रदीप थोरवत यांनी प्रवीण उगळे यांचा सत्कार केला. श्री. साळोखे यांनी मुलांत वाचन संस्कृती रुजविण्यासाठी 'एक विद्यार्थी एक पुस्तक,' संकल्पनेंतर्गत पालकांनी शिवजयंती दिवशी प्रतिष्ठानच्या ग्रंथालयासाठी पुस्तके भेट देण्याचे आवाहन केले. काशिलिंग मंगेश्वर मंदिराचे सचिव आनंदराव पिंगळे व संचालक उत्तम वावरे उपस्थित होते. राजेंद्र काटकर, मेघा माळी, रोहन भोगले, योगेश वेटाळे, शुभम कोळी, तेजस्विनी वेटाळे यांनी संयोजन केले.