कोल्हापूर - 'नो शेव्ह नोव्हेंबर' ही जगभरात सुरू असलेली एक व्यापक अशी मोहीम गेल्या 3 वर्षांपासून कोल्हापुरातील तरुणांनी सुद्धा हाती घेतली आहे. दाढीचे केस महिन्यासाठी वाढवून प्रतिकात्मकतेच्या माध्यमातून कॅन्सरच्या रुग्णांबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याचा हा एक आगळावेगळा प्रयत्न आहे. कोल्हापूरसह जिल्हाभरात कॅन्सर रुग्णांना या मोहिमेच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात येत आहे.
'नो शेव्ह नोव्हेंबर' ही मोहीम सर्वप्रथम ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहरात 1999 साली काही तरुणांनी एकत्र येऊन सुरू केली होती. या मोहिमेला जगभरातून अनेक युवकांनी प्रतिसाद दिला आहे. याचेच अनुकरण कोल्हापुरातील काही तरुणांनी करून ही मोहीम कोल्हापूरात सुरू केली आहे. दर्शन शहा, शेखर पाटील आणि त्यांच्या मित्रांनी ही मोहीम हाती घेतली असून गेल्या 2 वर्षात त्या सर्वांनी जवळपास 10 रुग्णांना पैशांच्या स्वरूपात मदत केली आहे. आजही 5 कॅन्सरग्रस्त रुग्णांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची मदत करण्यात आली.
मोहिमेत 500 हून अधिक तरुणांचा सहभाग
कोल्हापूर जिल्ह्यात कॅन्सरचे हजारो रुग्ण आहेत. ते या आजाराच्या वेदना सहन करत आहेत. त्यांच्या वेदना तर वाटून घेता येत नाहीत. पण त्यांच्याबद्दल सहानुभूती तरी निश्चितच व्यक्त करता येऊ शकते. हा विचार दर्शन आणि शेखर यांच्या मनात आला आणि याच विचाराने त्यांनी ही मोहीम कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत एक ग्रुप बनविला. त्यांच्या अन्य मित्रांनी सुद्धा या मोहिमेला पाठिंबा दिला.
हेही वाचा - "पवार युपीएचे अध्यक्ष झालेले आम्हाला आवडेल; तसा प्रस्ताव आल्यास आम्ही पाठिंबा देऊ"
मोहिमेत अनेक क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग
यावर्षी जवळपास 500 युवक या मोहिमेत सहभागी झाले आहेत. यामध्ये डॉक्टर, पोलीस, पत्रकार, शिक्षक, वकील, इंजिनिअर आणि व्यावसायिकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत अनेकजण जोडले गेले आहेत. महिनाभर दाढी करायची नाही, आणि त्यातून वाचणारी रक्कम जमा करून कॅन्सर रुग्णांना उपचारासाठी द्यायची या उद्देशाने ही मोहीम हाती घेतली घेतली आहे. 'नो शेव्ह नोव्हेंबर' या मोहिमेच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम डिसेंबर महिन्यात संबंधित रुग्णांना देण्यात येते.
यंदा 5 कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत
दरवर्षी 5 रुग्णांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून ग्रुपचे सदस्य मदत गोळा करतात. यावर्षी कोरोनाच्या या संकटकाळात सुद्धा सर्वांनी भरभरून मदत केली असून 5 कॅन्सरग्रस्त रुग्णांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची मदत देण्यात आली. प्रेस क्लबचे उपाध्यक्ष विजय केसरकर, कार्याध्यक्ष उद्धव गोडसे आणि सचिव मनजीत भोसले यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली.
पुढच्या वर्षी यापेक्षाही मोठ्या प्रमाणात मोहीम राबविण्याचे उद्दिष्ट
पुढच्या वर्षी दरवर्षीपेक्षाही मोठ्या प्रमाणात मोहिम राबविणार आहे. या मोहिमेला कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणांनी गेल्या 3 वर्षांपासून प्रतिसाद दिलाच आहे. यापुढेही कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत करण्यासाठी या मोहिमेला तरुणांनी हातभार लावावा असे आवाहन सुद्धा ग्रुपच्या सदस्यांनी केले आहे. यावेळी 'नो शेव्ह नोव्हेंबर' मोहिमेचे सर्वच सदस्य उपस्थित होते.
हेही वाचा - शरद पवार होणार युपीएचे अध्यक्ष? राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण