कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलने विजय खेचून आणत आपली सत्ता स्थापन केली. या निवडणुकीत सुरवातीपासूनच अनेक नाट्यमय गोष्टी घडल्या आहेत. 3 जागेवर ठाम असलेल्या शिवसेनेने मित्र पक्षांना सोबत घेऊन नवीन पॅनल उभा करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला थेट आव्हान देत निवडणुकीत 4 जागांवर शिक्कामोर्तब केला. या नंतर आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात येऊन जिंकलेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले. यावेळी आमदार विनय कोरे यांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारले असता कोणत्या तालुक्यातून किती मतदान झाले. याची माहिती घेऊन आमदार कोरे यांच्या आरोपांना उत्तर देण्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
हेही वाचा - Kolhapur Omicron : कोल्हापुरात ओमायक्रॉनचे 4 नवे रुग्ण; महापालिकेतर्फे उपयोजना सुरू
केडीसीसी बँकेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच कार्यकर्त्यांनी कोरोना नियम धाब्यावर बसवत केलेला जल्लोष हा कार्यकर्त्यांचा उत्साह आहे. अशा वेळेस मंत्री किंवा नेते तरी काय करणार? असे देखील मुश्रीफ म्हणाले.
आमदार विनय कोरे यांनी केलेल्या आरोपांचे विश्लेषण नंतर करू
सत्तारूढ आघाडीचे सर्व नेते प्रामाणिक राहिले असते तर, विरोधी आघाडीतील एकही उमेदवार निवडून येऊ शकला नसता. मात्र, ज्यांनी हे पाप केले, त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा आमदार विनय कोरे यांनी दिला होता. यावर बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी, ज्यांचा पराभव झाला याचा अर्थ ते उमेदवारच मतदारांना मान्य नव्हते. प्रक्रिया आणि पतसंस्था या दोन्ही गटातील आमचा पराभव हा धक्कादायक आहे. परिवर्तन आघाडीचे उमेदवार ज्या गटामध्ये विजयी झालेत त्यांचा त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासूनचा संपर्क होता. मात्र, आमदार कोरेनी दिलेली प्रतिक्रिया पाहता आपण त्याचे विश्लेषण करू. कोणत्या तालुक्यातून किती मतदान झाले. याची माहिती घेऊन आमदार कोरे यांच्या आरोपांना उत्तर देण्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
अध्यक्षपदाचा अजून निर्णय नाही, बैठक घेऊन सर्वानुमते निर्णय
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीला संधी असतानाही राष्ट्रवादीने या ठिकाणी दोन पाऊल मागे येत राहुल पाटील यांना संधी दिली. कॉंग्रेस आमचा थोरला भाऊ आहे. त्यामुळे अध्यक्ष पदासाठी काय निर्णय घ्यायचा हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी ठरवतील, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. येत्या दोन - तीन दिवसांमध्ये सत्ताधारी आघाडीचे १८ संचालक आणि पराभूत झालेले ३ उमेदवार, अशी २१ जणांची बैठक होणार असून त्यानंतरच जिल्हा बँक अध्यक्ष निवडीबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात येणार आहे.
सत्ताधारी आघाडीमध्ये झालेली लढाई म्हणजे नुरा कुस्ती नव्हती
गेली पाच वर्षे बँक अधिक चांगली होत गेली. येणाऱ्या काळात बँकेला देश पातळीवर अव्वल क्रमांकावर नेण्यासाठी आपले प्रयत्न असतील. दोन जागा बिनविरोध आणि एक स्वीकृत संचालक देण्याचा शब्द शिवसेनेला दिला होता. मात्र, सेनेन तीन जागांचा आग्रह धरल्याने कोणाला संधी द्यायची आणि कोणाला थांबवायचे याचा तिढा निर्माण झाला होता. तर, विरोधक आणि सत्ताधारी आघाडीमध्ये झालेली लढाई म्हणजे नुरा कुस्ती नव्हती. हा आरोप म्हणजे केवळ विनोद असून विनाकारण नुरा कुस्तीचे राजकारण करू नका, असे वक्तव्यही ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी केले.
ठरवून बदनामी करण्यासाठी चिठ्ठीचा वापर
काल मतमोजणी सुरू असताना मतदान पेट्यातून अनेक चिठ्ठ्या निघाल्या ज्यात अनेक मतदार हे जिल्हा बँकेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत होते. तर, एका मतदाराने तर चक्क ५० रुपये देखील टाकले होते. याबाबत मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, एखाद्याने चिठ्ठी टाकली म्हणजे तो त्या सर्व सात हजार मतदारांचा कौल नाही. त्याने टाकलेली चिठ्ठी म्हणजे परमेश्वर मत नाही. एखाद्याची मुद्दाम बदनामी करण्यासाठी देखील असे उद्योग चालू असतात. याच्याकडे लक्ष दिले तर, अजून चिठ्ठ्यांचे प्रमाण वाढेल. यामुळे याकडे फारसे लक्ष देण्याची गरजेच नाही.
हेही वाचा - Kolhapur District Bank Election : 40 केंद्रांवर बुधवारी पार पडणार जिल्हा बँकेचे मतदान; 33 उमेदवार रिंगणात