कोल्हापूर - सर्वसामान्य नागरिकांकडून बळजबरीने वीजबिल वसूल करत असाल तर याद राखा! गरीबावर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून वीज बिल वसूल करत असाल तर सहन केले जाणार नाही. राज्य सरकारमध्ये हिंमत असेल तर शाहू घराण्यावर गुन्हा नोंद करून दाखवावा, अंगावर केसेस घ्यायाला तयार आहोत, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिला. आज कृती समितीने महावितरण कार्यालयाला घेराव घातला त्यावेळी ते बोलत होते.
लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ व्हावे या मागणीसाठी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समिती आक्रमक झाली आहे. राज्य सरकारने एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीतील वीज माफ करावे अशी मागणी कृती समितीने केली आहे. मात्र, राज्य सरकारने दिशाभूल करत या मागणीला धुडकावून लावल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. अधिवेशनाच्या सुरवातीला वीज तोडणीला स्थगिती दिली व अधिवेशन संपताच ही स्थगिती उठवण्यात आली, याचा निषेध करण्यासाठी आज कृती समितीने ताराबाई पार्क येथील महावितरणच्या कार्यालयासमोर गोंधळ घातला. जवळपास दोन तास हे आंदोलन सुरू होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आक्रमक झालेल्या कृती समितीने अभियंता निर्मळे यांना आंदोलन स्थळी बोलावून आमची मागणी स्वीकारावी अशी मागणी उचलून धरली. त्यावर निर्मळे यांनी आंदोलन स्थळी येऊन हे निवेदन स्वीकारले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, नगरसेवक सत्यजित कदम, सुनील कदम, निवास साळुंखे, बाबा पार्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांचा निषेध करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.
यावेळी समरजित घाटगे म्हणाले, लॉकडाउनची झळ राज्यातील सर्व घटकांना बसली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज तोडणीला स्थगिती दिली तर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्थगिती उठवली. कोणताही ताळमेळ या सरकारमध्ये नाही. असा आरोप घाटगे यांनी केला. रविवारी काँग्रेसच्या एका नेत्याने वीज तोडणी चुकीचे असल्याचे वक्तव्य केले, ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी ऊर्जा मंत्र्यांना सांगून त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवावे, असेही घाटगे म्हणाले.
गोरगरीब जनतेला केसेसची भीती दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने बिल वसूल करत असाल तर चुकीचे आहे. संयम सुटण्याची वेळ पाहू नका, अन्यथा राज्यभर उद्रेक होईल. कागल मध्ये घडलेल्या प्रकारचा निषेध करत, जर हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा नोंद करून दाखवावा, असा इशारा समरजित घाटगे यांनी दिला. वीज तोडणी करू नका, झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सर्वपक्षीय कृती समितीने दिला आहे.
अधिकाऱ्यांशी चर्चा आणि आश्वासन -
दरम्यान आंदोलन कर्त्यासोबफ मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांच्या फोन वरून उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणली. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी चांगलाच जाब विचारला. लॉक डाऊन काळातील वीज बिल भरणार नाही, ऑक्टोबर महिन्यापासून पुढील वीज बिल हप्त्याने घ्यावे, वीज बिल थकीत ग्राहकांची वीज तोडणी करू नये अशी मागणी केली. त्यानंतर उच्च अधिकाऱ्यांनी मागणी मान्य केले असल्याचे घाटगे यांनी सांगितले.