कोल्हापूर - कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटे संदर्भात सर्वांनी आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. राज्य शासनाकडूनही योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या वेळेस 1700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज होती. पुढच्या वेळेला चार हजार मेट्रिक टनाची गरज भासेल, अशी व्यवस्था करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. त्याचप्रमाणे लसीकरण मोठ्याप्रमाणात सुरू असून लसीकरणात राज्यात कोल्हापूर हे अव्वल आहे, त्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापूरकरांचे कौतुक केले आहे.
कोल्हापुरात राजर्षी शाहू ब्लड सेंटरच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, लसीकरण अजून वाढला पाहिजे असे सांगत, कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे. मुश्रीफ साहेबांसारखे वजनदार मंत्री आहेत. ते नेहमी आग्रही असतात. कोल्हापूरला जास्तीत जास्त आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत, असा नेहमीच त्यांचा आग्रह राहिला असल्याचेही टोपे यांनी यावेळी सांगितले.
शासनाकडून जास्तीत जास्त लस मिळण्यासाठी प्राधान्याने लक्ष दिले- मुश्रीफ
या कार्यक्रमप्रसंगी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, लसीकरणाबाबत मंत्रिमंडळामध्ये अनेक वेळा बैठका झाल्या. बाधितांची संख्या जर जास्त असेल तर लसीकरणाचे डोस आम्हाला जास्त का मिळत नाही, असा सवाल आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विचारला होता. त्यानुसार शासनाकडून जास्तीत जास्त लसीचे डोस कसे मिळतील याकडे आम्ही प्राधान्याने लक्ष दिले, असेही मुश्रीफ यांनी यावेळी म्हंटले.
आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते राजर्षी शाहू ब्लड सेंटरच्या नवीन इमारतीचे उद्घाटन -
राजर्षी शाहू ब्लड सेंटरच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते 16 जुलै रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. तर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, नुतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व प्रमुख मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. शाहू ब्लड सेंटरचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी प्रास्ताविक करत सर्वांचं स्वागत केले.