कोल्हापूर - कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेली कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा 17 जुलैपासून पुन्हा सुरू होत आहे. काही दिवसांपासून कोल्हापुरातून तिरुपती, बेंगळुरू आदी ठिकाणच्या विमानसेवा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा कधी सुरू होणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले होते. मात्र आता 17 जुलैपासून ही विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होत आहे. त्यामुळे प्रवासी समाधान व्यक्त करीत आहेत.
अशी असेल विमानसेवेची वेळ
गेल्या अडीच महिन्यांपासून खंडित असलेल्या अहमदाबाद विमान सेवेमुळे कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग सातारा आदी जिल्ह्यातील नागरिकांसह उद्योजकांची मोठी गैरसोय झाली होती. मात्र पुन्हा विमानसेवा सुरू होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. ही विमान सेवा आठवड्यातील तीन दिवस सुरू असणार आहे. यामध्ये मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी विमानसेवा असून, अहमदाबादवरून सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी कोल्हापूरसाठी विमानाचे उड्डाण होणार आहे. हे विमान 10 वाजून 10 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर उतरणार आहे. हेच विमान पुन्हा सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी कोल्हापुरातून अहमदाबादकडे उड्डाण घेईल आणि दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी अहमदाबाद विमानतळावर उतरणार आहे. मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी या तीन दिवशी ही विमानसेवा याच पद्धतीने सुरू असणार आहे.