कोल्हापूर - कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील 50 वर्षांपुढील सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. जवळपास 11 लाख नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून या सर्व नागरिकांना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी समुपदेशनसुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली. जिल्ह्यातील आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत ही तपासणी होणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
जिल्ह्यातील 50 वर्षांपेक्षा जास्त असलेल्या आणि विविध व्याधीग्रस्त नागरिकांमध्ये कोव्हिड-19 विषाणू प्रतिबंधक रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपाययोजना सूचविण्याबाबत बैठक घेण्यात आली. यात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज आयुष समितीसुद्धा स्थापन केली असल्याची माहिती दिली. या समितीने उपाय योजनांबाबत येत्या दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.