कोल्हापूर - नवाब मलिक यांनी यंत्रणेवर केलेल्या आरोपाचे मी समर्थन किंवा विरोध करणं हे माझं काम नाही. ज्या यंत्रणेवर त्यांनी आरोप केले आहेत, त्यांनी त्याचं उत्तर दिले आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे. शिवाय बाकीच्या ठिकाणी धाडी पडल्या तर चालतं आणि तुमच्यावर धाडी पडल्या तर सूड उगवणे असं नाही होत म्हणत, शरद पवार यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
हेही वाचा - नितेश राणे आणि नीलम राणे यांच्याविरोधातील लुकआऊट नोटीस पुणे पोलिसांनी केली रद्द
वाघ यांनी जुन्या अनुभवातून टीका केली असेल : चंद्रकांत पाटील
चित्रा वाघ यांनी केलेल्या 'त्या' ट्विटनंतर पुन्हा एकदा एक नवीन राजकीय वाद पाहायला मिळत आहे. याबाबतच विचारले असता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, चित्राताई वाघ यांनी त्यांच्या जुन्या अनुभवातून टीका केली असेल. पण उशिरा का होईना महिला आयोगाला अध्यक्ष नेमत आहेत हे चांगले आहे. रूपालीताई कशा आहेत हे चित्राताई वाघ यांना माहिती असणार, त्यामुळे त्यांनी असे ट्विट केले असेल, असेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले.
संभाजीराजेंनी नेतृत्व करावे :
मराठा आरक्षण प्रश्नावरून संभाजीराजे छत्रपती पुन्हा एकदा आक्रमक झाले असून ते राज्याचा दौरा सुरू करणार आहेत. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हंटले की, संभाजीराजे यांच्या भूमिकेचे स्वागत आहे. मराठा समाजाला आता नेतृत्वाची गरज आहे. संभाजीराजे हे पक्षाच्याही वरती आहेत. त्यामुळे त्यांनी नेतृत्व करावे. सरकारचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, असे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करावी :
हसन मुश्रीफ यांच्याबाबत पोलीस स्टेशनने फार ढकलाढकल न करता रितसर गुन्हा दाखल करून चौकशी केली पाहिजे. किरीट सोमैया यांनी कोल्हापुरात येऊन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करून आता पंधरा दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करावी. 15 दिवस होऊनच गुन्हा दाखल नाही. त्यामुळे किरीट सोमैया कधीही कोर्टात जातील असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हंटले.
हेही वाचा - मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका; किरीट सोमैया ट्वीटमध्ये म्हणाले...