कोल्हापूर - बेळगावमधल्या चिक्कोडी तालुक्यातील हुक्केरी येथून 25 किलो वजनाची 860 पोती, असा एकूण 21 टन 500 किलो रेशनचा तांदूळ बेकायदेशीररित्या विक्रीस घेवून आलेला ट्रक जप्त केला आहे. अन्न धान्य वितरण अधिकारी माधवी शिंदे यांनी ही कारवाई केली आहे. हुक्केरी येथील रवी गजवर यांच्या रवी ट्रेडर्स कंपनीने बेकायदेशीररित्या या तांदळाचा साठा केला होता. तो सगळा तांदूळ ट्रकमध्ये भरून शाहूपुरी 5 व्या गल्लीमधील निधी ट्रेडींग कंपनी यांना विक्रीसाठी आणला असल्याची माहिती स्वतः ट्रक चालक असिफ मुल्ला यांनी सांगितली.
मिळालेल्या माहितीनुसार, शिधा पत्रिकेद्वारे स्वस्त धान्य दुकानांमध्ये वितरीत करण्यात येणारा तांदूळ घेवून येथील मार्केट यार्डमधील विक्रीस येणार असल्याची खात्रीशीर माहिती अन्न धान्य वितरण अधिकारी माधवी शिंदे यांना समजली होती. त्यानुसार अधिकारी शिंदे आणि त्यांच्या पथकाने मार्केट यार्ड येथे जावून पाहणी केली. त्यावेळी पोस्ट कार्यालय चौकाच्या पाठीमागील मोकळ्या आवारात ट्रक उभा असलेला दिसला. या पथकाने ट्रकजवळ थांबलेल्या व्यक्तीला ट्रकबाबत विचारणा केली. त्यावेळी ट्रकमध्ये तांदूळ असल्याचे त्यांनी सांगितले.
ट्रकमधील तांदळाच्या पोत्यांची पाहणी केली असता, त्यातील तांदूळ हा शिधापत्रिकेद्वारे लोकांना वितरीत करण्यात येणारा तांदूळ असल्याची खात्री झाली. बेकायदेशीररित्या साठा करुन हा तांदूळ विक्रीस आणल्याची या पथकाची खात्री झाली. शासनाची फसवणूक करुन बेकायदेशीररित्या कोणत्याही प्राधिकृत परवानगीशिवाय तसेच कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदी आदेशाचे उल्लघंन केल्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.