कोल्हापूर - कोरोना जगाला आणखी काय काय पाहायला लावणार आहे, याचा विचारच न केलेला बरा कारण कोल्हापूरातील एका हसत्या खेळाच्या कुटुंबावर या कोरोनामुळे दुःखाचा मोठा डोंगर कोसळल्याची घटना घडली आहे. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पतीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून त्यांची दोन मुलंही आता पोरकी झाली आहेत. खरंतर मम्मी, पप्पा रुग्णालयातून परत येतो सांगून गेले होते, त्यामुळे ते कधी परत येणार याची आस लावून दोघेही चिमुकले घरात बसले असल्याने त्यांना त्यांचे आई वडील त्यांना सोडून निघून गेले हे सांगायचे धाडस सुद्धा नातेवाईकांसह त्यांच्या ओळखीतल्या लोकांना होत नाही आहे. विशेष म्हणजे मृत्यूच्या तासाभरापूर्वीपर्यंत संपर्कात असलेला मित्र कायमचा निघून गेल्याने वर्गमित्र सुद्धा धक्क्यात आहेत.
शाहूवाडी तालुक्यातल्या शित्तूर तर्फ मलकापूर गावातील दुर्दैवी घटना -
शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर गावातील महादेव गणपती पाटील हे आपल्या पत्नीसोबत कामानिमित्त पुण्यातच वास्तव्यास होते. त्यांना सहावीत शिकणारा तन्मय आणि नववीत शिकणारी पूर्वा दोन मुले. ती सुद्धा त्यांच्यासोबत पुण्यातच राहायला होती. महादेव एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता. त्यांची पत्नी सीमा पाटील या सुद्धा एका खासगी कंपनीत नोकरी करत होत्या. मात्र, पुण्यात कोरोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे कंपनी बंद ठेवण्यात आली, त्यामुळे सर्वजण आपल्या शित्तूर तर्फ मलकापूर येथे आपल्या गावी आले. त्यावेळी त्यांनी सर्दी आणि किरकोळ ताप अशी लक्षणे होती. कोविड चाचणी केल्यानंतर त्याचा आणि त्यांच्या पत्नीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. 13 एप्रिल पासून ते दोघेही घरातूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत होते. दोन चार दिवसांनंतर त्यांची तब्येत आणखीनच खालावली त्यामुळे 18 एप्रिलला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 10 ते 15 दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, यामध्ये बुधवारी 28 एप्रिलला पत्नी सीमा पाटील यांचा सकाळी मृत्यू झाला. त्यानंतर लागोपाठ 29 एप्रिल रोजी पती महादेव पाटील यांचा मृत्यू झाला.
दुसरा दिवस उजाडला तरी मुलांना आई वडील गेल्याची माहिती दिली नाही -
18 एप्रिलला महादेव आणि सीमा दोघेही कोरोनाला हरवून आम्ही परत येतो असे मुलांना बोलून गेले होते. कोरोनामुळे मुलांना जवळही घेता आले नव्हते. परत येणार नाही असा विचार सुद्धा कदाचित त्यांच्या मनात आला नसावा. त्या दिवशीच त्या निरागस मुलांची आपल्या आई वडिलांशी झालेली शेवटची भेट. मात्र, रुग्णालयातून फोन वरून संपर्क साधून काळजी करू नका लवकरच परत येतोय असे आई वडील सांगत होते. दुर्दैवाने दोघांचाही कोरोनाने बळी घेतला. मुलंही मम्मी-पप्पा कधी येणार याची आस लावून आहेत, तर दोन दिवस फोन सुद्धा आला नसल्याने सैरभैर झाली आहेत. आज दुसरा दिवस संपत आला तरीही मुलांना त्यांचे मम्मी पप्पा त्यांना सोडून गेल्याचे सांगायचे धाडस कोणाला होत नाही आहे. महादेव यांच्या मित्रांना सुद्धा हे सर्व सांगत असताना हुंदका आवरता येत नाही आहे.
मित्रांशी फोनवरून सातत्याने होते संपर्कात -
महादेव पाटील यांनी त्यांच्या काही मित्रांना याबाबत सर्व कल्पना दिली होती. बायकोची तब्येत कशी आहे, याबाबत मित्रांना तसेच त्यांच्या म्हेवण्याला सुद्धा ते वारंवार विचारत होते. मात्र, जसजशी त्यांची तब्येत बिघडत गेली त्यांनी आपल्या मित्रांना काहीही करून बायकोला वाचवा, माझे तिच्यावर खूप प्रेम आहे, असे सांगत असल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले. मात्र, कोरोनाने शेवटी 28 एप्रिलला त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. महादेव यांचे मेव्हणे स्वतः डॉक्टर आहेत. त्यामुळे ते सुद्धा सातत्याने त्यांच्या संपर्कात होते. मात्र, आपल्या बहिणीचा मृत्यू झाल्याची माहिती असून सुद्धा त्यांनी धीर सोडला नाही. आपल्या भाऊजींना यामधून लवकर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत राहिले. मात्र, सर्वांचेच प्रयत्न शेवटी अपयशी ठरले आणि गुरुवारी रात्री महादेव यांचा सुद्धा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे एका आनंदी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
महादेव पाटील यांचा मोठा भाऊ आणि वहिनी सुद्धा घेतायत कोरोनावर उपचार -
महादेव यांचा मोठा भाऊ, वहिनी आणि त्यांचा मुलगा सुद्धा शाहूवाडी तालुक्यातील एका कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. पुण्याहून आलेल्या भाऊ महादेव आणि वहिनी सीमा यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांची सुद्धा कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये महादेव यांचे भाऊ वहिनी आणि त्यांचा पुतण्या पॉझिटिव्ह आले होते. त्यांची प्रकृती ठीक असून त्यांच्यावर शाहूवाडीमधील एका कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, महादेव आणि सीमा यांच्यावर कोल्हापुरातील पंचगंगा नदी येथील स्मशानभूमीत महापालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, या अशा परिस्थितीमुळे अंत्यविधीलाही कुटुंबातील कोणाला जाता आले नाही, मुलांनाही आपल्या आई-वडिलांना शेवटचे पहाता आले नाही, अशी अस्वस्थ करणाऱ्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.