कोल्हापूर - शहरातील ऐतिहासिक कोटीतीर्थ तलावाच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे कोल्हापूरकर पंचगंगा नदी प्रदूषणाचा सामना करत असतानाच आता शहरातील कोटीतीर्थ तलाव सुद्धा प्रदूषणाच्या विळख्यात आढळला आहे. इतकेच नाही तर कोणी अज्ञात व्यक्तीने घातक केमिकल टाकल्याने शेकडो मासे मृत्यूमुखी पडत आहेत. तीन ते सहा फूट इतक्या लांबीचे हे मोठे मासे मृत्यूमुखी पडत असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतः हे मासे बाहेर काढण्याचे काम सुरू केले असून याबाबत चौकशी करण्याची मागणी होत आहे.
पंचगंगा पाठोपाठ तलाव सुद्धा प्रदूषणाच्या विळख्यात
गेल्या 20 वर्षांपासून कोल्हापुरातील पंचगंगा नदी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. याबाबत अनेक वेळा आंदोलन झाली, प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यात आली. मात्र नदीचे प्रदूषण काही केल्या थांबत नाही. दररोज हजारो मासे मृत्यूमुखी पडत आहेत. शिवाय नागरिकांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आहे. अशातच शहरातील तलाव सुद्धा प्रदूषणाच्या विळख्यात आहेत. कोल्हापूरला तळ्यांचे शहर म्हणून एक वेगळी ओळख आहे. शहरात अनेक तलाव आहेत. मात्र ती सुद्धा प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत. यामध्ये रंकाळा पाठोपाठ आता ऐतिहासिक कोटीतीर्थ तलावाचे नाव आहे. कोणी अज्ञात व्यक्तीकडून केमिकल युक्त पाणी सोडल्याने हजारो मासे मृत्यूमुखी पडत आहेत. शिवाय अनेक नागरिक पाण्यात जनावरे तसेच कपडे धुण्यासाठी येत असतात, त्यामुळे सुद्धा पाणी प्रदूषित बनत आहे. त्यामुळे यापुढे असे कोणी निदर्शनास आल्यास संबंधित घटकांवर तत्काळ कारवाईची मागणी करण्याची गरज आहे.
हेही वाचा - Maharashtra ssc exam 2022 : आजपासून ऑफलाईन पद्धतीने दहावीच्या परीक्षा.. विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत