कोल्हापूर - हिटलर मेला ही समजूत खोटी असून येडियुरप्पा सरकारच्या निमित्ताने पुन्हा हिटलरशाहीचा जन्म झाला असल्याचे श्रीपाल सबनीस यांनी म्हटले आहे. बेळगाव जिल्ह्यात कुद्रेमनी आणि खानापूर येथे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात कुद्रेमनी येथे आयोजनाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, खानापूर येथील संमेलनावर कर्नाटक पोलिसांनी आक्षेप घेत साहित्यिकांना येथे येण्यास मज्जाव केला आहे. याबाबत कर्नाटक सरकारच्या धोरणाचा निषेध करत श्रीपाल सबनीस यांनी येडियुरप्पावर उपरोक्त टीका केली आहे.
बेळगाव जिल्ह्यात दोन ठिकाणी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कुद्रेमनी या मराठी भाषिकांच्या गावात आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाला पोलीस आणि प्रशासनाने काही अटींवर परवानगी दिली आहे. तर, दुसरीकडे खानापुरातील साहित्य संमेलनावर मात्र कर्नाटक पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. या संमेलनाला महाराष्ट्रातून श्रीपाल सबनीस, सुनंदा शेळके आदी साहित्यिक जाणार होते. पण, त्यांच्या येण्यावर कर्नाटक पोलिसांनी अटक करण्याचा इशारा दिला आहे आणि खानापूरमध्ये येण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे, श्रीपाल सबनीस यांनी कर्नाटक सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. जवळपास ४ ते ५ हजारांचा समुदाय या संमेलनाला येणार होता. पण, कर्नाटक सरकारने माती खाल्ल्याचे सबनीस यांनी म्हटले आहे. हिटलर मेला ही समजूत खोटी असून येडियुरप्पाच्या सरकारच्या निमित्ताने पुन्हा हिटलरशाहीचा जन्म झाला असल्याचे सबनीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, कर्नाटक सरकारच्या या दडपशाहीच्या विरोधात महाराष्ट्रासह सीमाभागातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
हेही वाचा- कोल्हापुरात चक्क पोलीस ठाण्यावर चोरांनी मारला डल्ला, 14 लाखांच्या ऐवजासह केला पोबारा