कोल्हापूर - प्लास्टिक कचऱ्यापासून कोल्हापूर मुक्त करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने नामी शक्कल लढवली आहे. शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठीही अनोखा उपक्रम असणार आहे. राज्यात पहिल्यांदा हा उपक्रम राबविला जात आहे. प्लास्टिक द्या आणि स्टेशनरी घ्या असा हा उपक्रम असून याची सुरुवात कोल्हापुरातून झाली आहे.
पर्यावरणाच्या अनेक समस्या
प्लास्टिक विघटनाची समस्या जगाला भेडसावत आहे. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने पर्यावरणाच्या अनेक समस्या समोर येत आहेत. त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारने प्लास्टिक पिशव्यांसह काही वस्तूवर बंदी घातली आहे. तसेच प्लास्टिक कचरा होऊ नये, याची खबरदारी घेत विविध योजना आखल्या जात आहेत. त्याच धर्तीवर कोल्हापूर महानगरपालिकेने राज्यात प्रथमच अनोखा उपक्रम राबविला आहे. प्लास्टिक कचरामुक्त कोल्हापूर होण्यासाठी' प्लास्टिक द्या आणि स्टेशनरी घ्या' असा उपक्रम राबवला आहे. याला नुकतीच सुरुवात झाली आहे.
शालेय विद्यार्थ्यांना होणार फायदा
शालेय विद्यार्थ्यांसह लहान मुलांकडून प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण अधिक आहे. याचे प्रमाण कमी व्हावे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जमा झालेला प्लास्टिक कचरा साठवून तो महापालिकेकडे जमा करावा आणि स्टेशनरी घेऊन जावी, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
रोज ५-६ टनांचा प्लास्टिक कचरा
कोल्हापूर शहरात दररोज सुमारे ५-६ टनांचा प्लास्टिक कचरा जमा होतो. त्यातील सुका प्लास्टिक कचरा महापालिकेकडे जमा करावा आणि त्याची स्टेशनरी घेऊन जावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
'लहानांची पर्यावरणाबद्दल गोडी वाढावी'
लहान मुले व विद्यार्थ्यांना पर्यावरणाची गोडी निर्माण व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महानगरपालिकेने हा उपक्रम सुरू केला आहे. प्लास्टिक जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. त्याला प्रतिसाद देत प्लास्टिक जमा करून स्टेशनरी घ्यावी, असे आवाहन आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी केले.