कोल्हापूर - कोरोनामुळे माणुसकीचासुद्धा अंत झाला हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. संसर्गाच्या भीतीने जवळचे नातेवाईक आणि कुटुंबीयसुद्धा मृतदेह स्वीकारायला तयार नव्हते अशी अनेक उदाहरणे आहेत. अशाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोल्हापुरातील बैतुलमाल कमिटीचे मुस्लीम बांधव पुढे आले आहेत. पाहुयात यावरचा स्पेशल रिपोर्ट...
हेही वाचा - व्यवस्थेचे बळी: रुग्णालयात उपचार न मिळाल्याने गायकवाडांच्या घरची सावली हरपली
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच आहे. हळूहळू मृत्यूची संख्यासुद्धा वाढू लागली आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीने रक्तातल्या नातेवाईकांनीसुद्धा कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार देत पाठ फिरवल्याच्या घटना पाहायला मिळत आहेत. रक्तातील नातेवाईकच पुढे येत नसल्याने प्रशासनासमोरसुद्धा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अशीच एक घटना इचलकरंजी येथे रमजान महिन्यात घडली. ही गंभीर बाब समजताच कोल्हापुरातील बैतुलमाल कमिटीने पुढाकार घेऊन सर्वच समाजातील कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर पुढे होऊन अंत्यसंस्कार करण्याचे ठरवले. त्यानुसार गेल्या 2 महिन्यांपासून कोरोनाने मृत्यू झालेल्या अनेक मृतदेहांवर मुस्लीम बांधवांनी अंत्यसंस्कार करत सामाजिक ऐक्याचे तसेच माणुसकीचे दर्शन घडवले.
कोल्हापुरातील बैतुलमाल कमिटीने आजपर्यंत अनेक सामाजिक कार्ये केले आहेत. मग गत वेळच्या महापुरात पूरग्रस्तांना केलेली मदत असो, किंवा निराधारांना आधार देणे. त्यामुळे नेहमीच सामाजिक कार्यात बैतुलमाल कमिटीच्या मुस्लीम बांधवांचा पुढाकार राहिला आहे.
कोरोनाच्या या गंभीर काळातसुद्धा बैतुलमाल कमिटीच्या सामाजिक कार्याचा प्रत्यय आला आहे. आतापर्यंत मुस्लीम बांधवांनी रक्तातल्या नात्याप्रमाने सर्वच समाजातील जवळपास 200 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. त्यासाठी बैतुलमाल कमिटीमधील अनेकजण स्वतःहून या सेवेमध्ये आपले योगदान देत आहेत. हिंदू तसेच ख्रिश्चन समाजातील मृतदेहांवरसुद्धा त्यांच्या धर्माप्रमाणे अंत्यविधी केल्याचे तौफिक मुल्लाणी यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - 'व्यवस्थेने आमचा आधार नेला'; सख्ख्या भावांच्या निधनाने चव्हाण कुटुंबीयांवर कोसळलं आभाळ
कोल्हापूर जिल्हा प्रशासनानेसुद्धा कमिटीच्या या कार्याचे कौतूक केले असून, प्रशासनाकडून सर्वच सुरक्षेची साधने पुरवण्यात येत आहेत. दरम्यान, अंत्यसंस्कार करणे किती भाग्याचे असते याचे महत्वसुद्धा जाफरबाबा यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना स्पष्ट केले. तसेच समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तींना मदत करणे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
मृत्यूपासून कोणच चुकणार नाही. गरीबालासुद्धा मृत्यूला सामोरे जावे लागणार आहे आणि श्रीमंताला सुद्धा, त्यामुळे शेवटी मृतदेहाची हेळसांड होऊ नये म्हणून सुरू केलेले हे सामाजिक कार्य जोपर्यंत गरज लागेल तोपर्यंत करत राहणार असल्याचेही जाफरबाबा यांनी सांगितले आहे.