कोल्हापूर - सैन्यात नोकरीच्या आमिषाने 21 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजी विद्यापीठाच्या पहारेकऱ्यांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तानाजी पवार (रा.कासार पुतळे, ता.राधानगरी) व रोहित मारुती मुळीक (रा.भादवण, ता.आजरा) अशी दोन्ही पहारेकाऱ्यांची नावं आहेत. दरम्यान, याचा शोध राजारामपुरी पोलीस करत आहेत.
शिवाजी भगवान फड (रा.मळगाव देवकरा, ता.अहमदपूर,लातूर) हे वारंवार कोल्हापुरात येत होते. त्यावेळी तानाजी पवार यांच्यासोबत त्यांची ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत सप्टेंबर 2019 पासून ते आजपर्यंत तानाजी पवार यांनी शिवाजी फड यांच्याकडे नोकरीच्या आमिषाने जवळपास 21 लाख 50 हजार रुपये घेतले. त्यांचा मित्र रोहित मुळीक यांच्या मदतीने तक्रारदार व त्यांच्या सहकारी मित्रांकडून सैन्यदलाच्या कॉन्टॉन्मेंट बोर्डात नोकरीस लावण्याचे आमिष देण्यात आले. यासाठी त्याच्या सहकारी मित्रांकडून पैशांची मागणी केली. त्यावेळी नोकरीचे मूळ बनावट नियुक्तीपत्र, त्यावर भारतीय सेनेचा लोगो, सही आणि शिक्का, तसेच बनावट आयडेंटीटी कार्डवर फोटो-सही-शिक्का देऊन तक्रारदार व सहकारी मित्रांची फसवणूक केली.
फसवणुकीची बाब लक्षात येताच शिवाजी फड यांनी राजारामपुरी पोलीस ठा ण्यात या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद केला. तानाजी कृष्णात पोवार हे शिवाजी विद्यापीठाचे पहारेकरी म्हणून सेवा बजावत आहेत. अधिक तपास राजारामपुरी पोलीस करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.