कोल्हापूर - शिवसेनेच्या आजी आमदारांबरोबरच आता माजी आमदार ही एकनाथ शिंदेच्या गटात जात आहेत.शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार राजेश क्षीरसागर हे एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. आज सकाळी राजेश क्षीरसागर हे गुवाहाटीमध्ये दाखल झाले आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिंदे गटात सामील झाले आहेत. याबाबतचे व्हिडिओ ही समोर आले आहेत. या सर्व घटनांमुळे राजेश क्षीरसागर यांच्यावर शिवसैनिक नाराज असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजेश क्षीरसागर यांच्या संपर्क कार्यालय व त्यांच्या निवास्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, आता या सर्व घडामोडीवरुन आमदारच नाही तर माजी आमदार व खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत का हा प्रश्न उपस्थित होत आहे.
निष्ठावंत शिवसैनिक शिंदेच्या गळाला - दोन ते तीन दिवसांपूर्वी मुंबईतून एकनाथ शिंदे हे शिवसेनेचा फुटीर गट घेऊन सुरतेला रवाना होत असतानाच कोल्हापुरातून शिवसेनेच्या पाच माजी आमदारांना शिवसेनेचे कट्टर, निष्ठावंत, आक्रमक असलेले माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी गोव्यात घेऊन गेले होते. गेल्या काही दिवसात राजकीय घडामोडी सुरू असताना स्वतः राजेश क्षीरसागर मात्र इतर चार माजी आमदारांना शिंदे गटाकडे वळवण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, आता शिंदे गटात सामील होऊन काहीच साध्य होणार नाही. उलट कडवट शिवसैनिक आणि मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, याची जाणीव झाल्याने चारही माजी आमदार कोल्हापुरात परत आले आणि राजेश क्षीरसागर हे मुंबईकडे रवाना झाले आणि तेथून ते आज सकाळी गुवाहाटीला पोहचले आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या गटात सहभागी झाले आहेत.
कोल्हापूर उत्तर हे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो येथूनच राजेश क्षीरसागर दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, 2019 ला त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र, तरीही या निष्ठावंत शिवसैनिकाला उद्धव ठाकरे यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष पद सोपवले. यामुळे त्यांना आमदार नसले तरी त्यांना एका मंत्रिपदाचा दर्जा ही प्राप्त झाला. या पदावरून त्यांनी राज्यातील अनेक भागात विकास कामे केली तसेच कोल्हापूरमध्ये रंकाळा सुशोभीकरणासह अनेक विकास कामाचा सपाटा लावला होता. तसेच मोठा निधीही मंजूर करून आणला होता. मात्र, हे सर्व सुरू असताना कोरोना काळात डिसेंबर 2021 मध्ये आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले आणि कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक लागली यावेळी ही राजेश क्षीरसागर हे या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते. मात्र, महाविकास आघाडी असल्याने ही जागा काँग्रेसला देण्यात आली. यावेळी ही राजेश क्षीरसागर हे 2 ते 3 दिवस नॉट रीचेबल होते. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांना मुंबईत बोलावून घेऊन त्यांची नाराजी दूर केली. मातोश्रीचा आदेश हा अंतिम आदेश मानणारे राजेश क्षीरसागर हे कोल्हापूर उत्तरची जागा दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना दिली आणि त्यांचा जोरदार प्रचार करत निवडून आणले. मातोश्रीचा आदेश हा अंतिम आदेश मानणारे राजेश क्षीरसागर हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला का जाऊन मिळाले हा प्रश्न आता शिवसैनिकांमधून विचारला जात आहे.
राजेश क्षीरसागर आणि एकनाथ शिंदे यांचे खास संबंध - माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे खास संबंध असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. गेल्या काही महिन्याखाली कोल्हापुरातील भालजी पेंढारकरांचे जयप्रभा स्टुडिओ हे राजेश क्षीरसागर यांचे दोन सुपुत्र व त्यांच्या सोबतचे काही सहकाऱ्यांनी लक्ष्मी एलपी या फर्मच्या नावाखाली खरेदी केल्याचे समोर आले. यानंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले. दरम्यान, जेव्हा संपूर्ण कोल्हापूरकरांच्या वतीने या प्रकरणाचा निषेध होऊ लागला त्यावेळी राजेश क्षीरसागर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करून त्यांची मदत घेत जयप्रभा स्टुडिओच्या बदल्यात महापालिकेने वेगळी जागा द्यावी तसेच सदरची जागा ही महापालिकेने ताब्यात घेऊन त्याचा विकास करावा यासाठी मध्यस्थी करण्याचे आवाहन केले. त्याप्रकारचे नगरविकास खात्याकडून महापालिकेला पत्रही आले. पण, निवडणुका आणि राजकारणामध्ये हे प्रकरण अद्यापही सुटलेले नसून जयप्रभा स्टुडिओच्या दारात अद्याप ही कलाकारांच्या वतीने साखळी उपोषण सुरूच आहे. मात्र, या सर्व प्रकरणावरून एकनाथ शिंदे व राजेश क्षीरसागर यांचे घनिष्ट संबंध असल्याचे समोर आले होते.