कोल्हापूर - लॉकडाऊन व महापुरामुळे आर्थिक फटका बसलेल्या जिल्ह्यातील हजारो पूरग्रस्त महिलांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. बेकायदेशीर कर्जपुरवठा व वसुलीसाठी तगादा लावणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच राज्यातील मंदिरे बंद आहेत, पण दारू दुकाने सुरू आहेत. त्यामुळे महिलांना मटका आणि दारू व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागण्यांचा विचार करा, अन्यथा महिला वेगळा विचार करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
जोरदार घोषणाबाजी
मायक्रो फायनान्सची कर्ज माफ करा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील हजारो पूरग्रस्त महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. छत्रपती शासन या संस्थेच्या पुढाकारातून ताराराणी चौकात दोन थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो महिलांनी भर पावसात धडक दिली. जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत मायक्रो फायनान्सची कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत तिथून न उठण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे.
कर्ज वसुलीसाठी तगादा
लॉकडाऊन आणि महापुराच्या काळात महिलांना कर्ज वसुलीसाठी मायक्रो फायनान्सच्या कंपन्यांनी मोठा तगादा लावला आहे. तसेच या ठिकाणी शिवीगाळ आणि महिलांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार मायक्रो फायनान्सच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे महिलांच्या हाताला रोजगार नाही. कर्ज फेडण्याचा अडचण येत आहे. मात्र मायक्रो फायनान्स कंपन्यांनी लावलेल्या तगादामुळे अनेक महिला आत्महत्येचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
दोन तास ठिय्या
वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात तगादा लावत असल्याने मायक्रो फायनान्स कंपनीच्या विरोधात आज हजारो महिलांनी हल्लाबोल केला आहे. भर पावसात हातात फलक घेऊन काठी घेऊन महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जवळपास दोन तास ठिय्या मांडला. जोपर्यंत मायक्रो फायनान्स कंपनी कर्ज माफ करत नाही, तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातून उठणार नाही, असा इशारादेखील महिलांनी दिला आहे.
'दारू-मटका सुरू करण्यास परवानगी द्या'
लॉकडॉउनमुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेक व्यवसायांवर मर्यादा आली आहे. तर मंदिराच्या जिवावर उदरनिर्वाह करण्यासाठी मंदिरेदेखील सुरू नाहीत. मात्र राज्य सरकारने दारूची दुकाने सुरू ठेवली आहेत. त्यामुळे महिलांनादेखील आता दारू व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, तसेच मटका घेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही या मोर्चादरम्यान महिलांनी केली आहे.