कोल्हापूर - गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांचे आणि शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन तोडल्याचा निषेधार्थ गावकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच (Mahavitaran Office Kolhapur) कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांच्यासमोर डिझेल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न (Farmer Self-Immolation Attempt) केला आहे. अचानक झालेल्या या घटनेने महावितरण कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आक्रमक शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचाही प्रयत्न केला आहे. निवास पाटील असे डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. यावेळी महावितरण अधिकारी वीज तोडण्याचे समर्थन करताना दिसत होते.
शेतकऱ्यांनी अंगावर ओतून घेतले डिझेल :
कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या महे, कसबा बीड, वाशीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांची गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या आणि शेतकऱ्यांचा विजेचे कनेक्शन पूर्व कल्पना न देता तोडले होते. त्यामुळे आक्रमक होत वीज तोडण्याच्या निषेधार्थ महावितरणचे कार्यकारी अभियंता डी. एस. पाटील यांच्यासमोर डिझेल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱयांना विचारल्यास ते एकमेकांवर नाव घालून बोलणे टाकतात, तसेच स्थानिक प्रतिनिधींचे देखील लक्ष नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, खिशात असणारी काडीपेटी डिझेलमध्ये भिजल्याने आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी त्याला रोखल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
यावेळी महावितरणचे अधिकारी आणि गावकरी यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी उडाली. तब्बल तासभर हे सगळे शेतकरी अधिकाऱ्यांची वाट बघत डिझेलचा कॅन शेजारी घेऊन बसले होते. मात्र, तरीही अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे हा सर्व प्रकार चिघळला आणि एकच राडा झाला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी येऊन आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.