कोल्हापूर - प्रचारादरम्यान केलेल्या वक्तव्यावर भाजपचे प्रवक्ते तथा माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik Controversial Statement) ठाम आहेत. शिवाय मी कोणत्याही पद्धतीने चुकीचे वक्तव्य केले नसून महिलांचासुद्धा अवमान केला नाही. शिवाय केवळ दोन्ही उमेदवारांमध्ये तुलना करा असे म्हणालो होतो. यावेळी प्लंबरचे काम प्लंबरच करेल, इलेक्ट्रिशियनचे काम इलेक्ट्रिशियनच करेल असे म्हणालो होतो. कोणाचाही अवमान केला नाही. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांनी याचा विपर्यास केला, असेही धनंजय महाडिक म्हणाले. कोल्हापुरात आयोजित मेळाव्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
महिलांबद्दल आम्हाला नेहमीच आदर; त्यांनी आम्हाला शिकवू नये : काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भाजपच्या उमेदवाराविरोधात बोलण्यासारखा आता कोणताही मुद्दा त्यांच्याकडे नाही. त्यामुळे ते मी केलेल्या भाषणातील एक मुद्दा उचलून धरत त्याचा विपर्यास करत आहेत. महाडिक परिवार महिलांबाबत नेहमीच आदर ठेवून आहे. शिवाय महिलांच्याबद्दल आम्हाला किती आदर आहे हे त्यांनाही माहिती आहे शिवाय इथल्या जनतेला माहिती आहे. अरुंधती महाडिक तसेच शौमिका महाडिक गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी काम करत आहेत. त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करत आहेत.
चित्राताई वाघ यांना चुकीची माहिती दिली; मी त्यांच्याशी बोललो : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनासुद्धा काहीतरी भरवण्यात आले आहे की मी महिलांबाबत चुकीचे बोललो आहे. मात्र, त्यांना मी फोनद्वारे संपर्क साधला आहे, असे धनंजय महाडिक म्हणाले. आज चित्रा वाघ यांनीसुद्धा सूचक असे ट्विट केले होते. महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्रभूमीत औरंगजेब रडवला. इतिहास सांगतो आमचा, स्त्रीने शत्रू तुडवला. असे म्हणत महिलांचा सन्मान व्हायलाच हवा, कोणीही मातृशक्तीचा अपमान होईल अशी वक्तव्ये करू नयेत असे ट्विट केले होते. त्यांच्या या ट्विटनंतर महाडिक आम्ही त्यांचा गैरसमज दूर केल्याचं म्हणाले.
काय म्हणाले होते धनंजय महाडिक? - कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणूकीमध्ये प्रचारादरम्यान भाजपचे नेते माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाविकास आघडीच्या महिला चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. महाडिक यांच्या विरोधात काळ्या साड्या परिधान करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत. महाडिक यांनी महिलांच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेणारे वक्तव्य केल्याने महिला तसेच कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. महाडिक भाषण करत असताना योग्य उमेदवाराला निवडा असे सांगत होते. हे सांगत असतानाच ते म्हणाले, काँग्रेसचे नेते आपल्याकडे येतील. महिला उमेदवार आहे. तुम्ही सगळ्या महिला आहात, ती बिचारी आहे त्यामुळे तीला मतदान करा असे म्हणतील. पण मला सांगा तुमच्या कुटुंबातील तुमचा पती गेला आणि तो आधी प्लंबिंग काम करत असेल तर तुम्हाला प्लंबिंग काम जमणार आहे का? जर तुमचा पती इलेक्ट्रिशीयन असेल तर तुम्हाला ते काम जमणार आहे का? ज्याचे काम त्यानेच करायचे असते. त्यांचे पती आमदार होते म्हणून लगेच त्यांच्या पत्नीला पुढे आणले असेही धनंजय महाडिक म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतरच महिलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला असून त्यांचा अनादर केल्याचा रोप महाडिकांवर केला जात आहे.