कोल्हापूर : दरवर्षी जिल्ह्यासह राज्यातील अनेक भाविक करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनासाठी ( Devotees In KOlhapur Ambabai Temple ) कोल्हापुरात येत असतात. भक्तांकडून नवस, श्रद्धा आणि सेवेकरिता अशा विविध कारणासाठी मंदिरातील दक्षिणा पेटीत भरभरून दान करण्यात येत असते. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दानपेट्या मंगळवारी दुपारी उघडण्यात आल्या ( Donation boxes Opened Ambabai temple ) आहेत. या दानपेट्यातील रोख रक्कम आणि सोने चांदीला मोजण्याचे काम सुरू करण्यात आले ( Ambabai Temple Donation Counting Started ) आहे.
दहा, वीस, पन्नास आणि शंभरच्या नोटा जास्त
दानपेट्यात दहा, वीस, पन्नास आणि शंभरच्या नोटांचे प्रमाण जास्त आहे. मंदिर प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून या नोटा मोजून बंडल करून ठेवायचे काम सुरू करण्यात आले आहे. अंबाबाई मंदिर आणि परिसरात एकूण 12 दानपेट्या आहेत. त्यातील आज एक दान पेटी उघडण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या निगराणीखाली दानपेट्यातील रक्कम मंदिरातील गरुड मंडपात मोजायला सुरूवात करण्यात आली आहे.
४० पेक्षा जास्त कर्मचारी मोजणीला
देवस्थान समितीतील ४० कर्मचारी, मंदिरातील सुरक्षा रक्षक, स्टेट बँक ऑफ इंडियाचे ३ कर्मचाऱ्यांकडून नोटा मोजल्या जात आहेत. पहिल्याच दिवशी पहिल्या दानपेटीमधून अंदाजे ३६ लाख ४८ हजार ५४७ रुपये रोख रक्कम निघाली आहे. काही भक्तांनी दान पेटीत सोने, चांदीदेखील टाकले आहेत. हे सर्व सोनं, चांदी वेगवेगळे करून त्याची शुद्धता तपासून त्याचेदेखील वजन आणि आकडेवारी काढण्यात येत आहे.
आणखी 5 दान पेट्या उघडल्या जाणार
आणखी 5 दान पेट्या उघडल्या जाणार असल्याने पुढील अजून २ ते ३ दिवस मोजदाद सुरू असेल असे मंदिर समितीकडून सांगण्यात आले आहे. कोरोना काळात गेली अनेक महिने करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर भक्तांसाठी बंद ठेवण्यात आले होते. यामुळे भक्त मंदिरात येऊ शकले नाहीत. म्हणून दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी दानपेटीत कमी दान पडले असल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर मंदिरे चालू झाल्यापासून अनेक भक्त मंदिरात येत आहेत. दानपेटीमध्ये रोख रकमेसह सोने-चांदी चे दागिने आणि बरेच काही दक्षिणा पेटीमध्ये टाकत आहेत. या सर्वांची वर्गवारी करून सोन्याची शुद्धता तपासून नकली असलेले सोने, चांदी बाजूला काढून अस्सल सोने- चांदीचे वजन करून त्याला सुरक्षित ठेवण्यात येत आहे. तर पैशाचे देखील वेगवेगळ्या नोटांचे बंडल करून ठेवण्यात येत आहेत. पैसे मोजण्यासाठी मशीन देखील आणण्यात आली आहे. येत्या काही दिवसात मकर संक्रांति आहे. यामुळे अनेक भक्त दानपेटीमध्ये तिळगुळ देखील टाकतात. यामुळे नोटा खराब होण्याची शक्यता असते. म्हणून दानपेटी उघडण्यात आल्या आहेत.