कोल्हापूर - जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 300 वर गेल्याने, शहरातील महापालिकेने एक मोहीम हाती घेतली आहे. शहरातल्या भाजी मार्केटमधील फळ-भाजी विक्रेते, फेरीवाले यांची कोरोना चाचणी व लसीकरण मोहीम सुरू केली आहे. तसेच त्यांची आरोग्य तपासणीही कोल्हापूर महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे, याला भाजी विक्रेत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून आज दिवभरात २०० जणांची तपासणी करण्यात आली आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रेत्यांना कोरोना चाचणी करणे आवश्यक
शहरातील फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवेतील दुकानदार फळ, भाजी विक्रेते आणि फेरीवाले यांचे लसीकरण आणि कोरोना चाचणी तातडीने करण्याच्या सूचना आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आजपासून कोल्हापुरातील या सर्वांची लसीकरण आणि कोरोना चाचणी करण्यास सुरुवात झाली आहे. आज दिवसभरात जवळपास दोनशे जणांची चाचणी करण्यात आली.
शहरातील ९ भाजी मार्केटमध्ये व्यवस्था
फेरीवाले भाजी विक्रेते यांना आरटी-पीसीआर चाचणी आणि लसीकरण पूर्ण करून घेण्याच्या सूचना दिल्यानंतर कोल्हापुरातील नऊ भाजी मार्केटमध्ये याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर 45 वर्षावरील विक्रेत्यांना लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान आज कपिलतीर्थ मार्केटमधील बॅडमिंटन हॉल येथे भाजीपाला फेरीवाले यांचे स्वब घेण्यात आले होते. त्यावेळी भाजीविक्रेत्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिल्याचे चित्र बघायला मिळाले होते.
हेही वाचा - अनिल देशमुखांना सीबीआयचे समन्स