कोल्हापूर - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर शरसंधान साधले आहे. राज्य सरकार हे संभ्रमाचे सरकार असल्याची घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) आगामी अधिवेशन नागपूरमध्ये (Winter session nagpur) घेणार नाही, तर हे अधिवेशन मुंबईतच घेणार असल्याची शंकाही उपस्थित केली आहे. तसेच अमरावती, मालेगाव, नांदेड हिंसक घटनेप्रकरणी (Amravati violence case) निवृत्त न्यायाधीशा मार्फत चौकशी करण्याची मागणीही चंद्रकांत पाटील (Chandrakat Patil) यांनी केली आहे. अमरावती, मालेगाव हिंसक घटनेच्या निषेधार्थ चंद्रकांत पाटील यांनी आज (मंगळवारी) निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
उपजिल्हाधिकारी यांना दिवेदनाद्वारे चौकशीची मागणी
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची क्लिप व्हायरल करून महाराष्ट्रातील मालेगाव, अमरावती आणि नांदेड येथे नुकत्याच दंगली झाल्या. 15 हजार ते 20 हजार लोकांच्या जमावाने रस्त्यावर उतरून दुकाने, कार्यालय तसेच गाड्यांचा विध्वंस केला गेला. या घटनेचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो. त्यामुळेच भाजपाच्या शिष्टमंडळाने आज घटनेच्या निषेधार्थ निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना भेटून निवेदन दिले. शिवाय या दंगलीमागे कोणाचा हात होता, याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली असल्याचे पाटील म्हणाले.
'कोणत्याच गोष्टीवर शासनाचा वचक नाही'
राज्यात अराजकता माजली असून कोणत्याही गोष्टीवर शासनाचा वचक राहिला नाही. हप्ते, दडपशाही, अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या लोकांना धाक दाखवन्यापूरती यंत्रणा वापरली जात आहे. दंगलखोरांना अभय देण्याचे काम सुरू आहे. आता पोलिसांवर देखील हल्ले होऊ लागले आहेत. फक्त जातीच्या राजकारणासाठी सत्तेच्या हव्यासापोटी अशा गंभीर घटनेकडे कानाडोळा करण्याचे कार्य सुद्धा हे सरकार करत आहे, अशी टीका सुद्धा चंद्रकांत पाटलांनी केली. मोदी सरकारच्या काळात तसेच फडणवीस सरकारच्या काळात राज्यात आणि देशात एकही दंगल घडली नाही. मात्र आता असे प्रकार घडतात ही चिंतेची गोष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
हेही वाचा - Curfew relaxation in Amravati : अमरावतीत सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत बाजारपेठ सुरू