कोल्हापूर- कोरोना नियमांचे उल्लंघन करत कोल्हापुरात 21 फुटी उंच गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. बंदी असताना देखील नियमबाह्य पद्धतीने कोल्हापुरातील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाची एकमेव 21 फुटी उंचीची मूर्ती विसर्जन मार्गावर उतरवण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता या गणेशमूर्तीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांनी ही मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्यप्रमाणात गर्दी केली आहे. दरम्यान पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे.
राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मूर्तीच्या उंचीवर निर्बंध घातले आहेत. मात्र राज्यात एकमेव असा हा 21 फुट उंच महागणपती शिवाजी चौक तरुण मंडळाने बसवला आहे. गेल्या काही दिवसांपासून या महागणपतीचे लाइव्ह प्रक्षेपण भाविकांसाठी ऑनलाइन खुले होते. मात्र विसर्जनाच्या आदल्या दिवशी कार्यकर्त्यांनी हा 21 फुटी गणपती मंडपासमोर आणून ठेवला. नियम मोडल्यामुळे आता या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
पोलीस कारवाई करणार का?
दरम्यान पोलिसांनी शनिवारी पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करत ही गणेश मूर्ती रविवारी पहाटे विसर्जन करावी अशा सूचना दिल्या होत्या. मात्र कार्यकर्त्यांनी या नियमांचे उल्लंघन करत सकाळी 11 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली आहे. त्यामुळे हजारो भाविकांची गर्दी या महागणपतीच्या दर्शनासाठी पाहायला मिळते. मिरवणुकीला बंदी असतानाही छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाने मिरवणूक काढल्याने आता पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या महा गणपतीचे विसर्जन इराणी खण परिसरात होणार आहे. त्यामुळे या मार्गावर प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. कोणत्याही परिस्थितीत गर्दी होऊ नये याची काळजी पोलीस प्रशासन घेत आहे.
हेही वाचा - Ganesh Visarjan Live - पुण्यातील तुळशीबाग गणपतीच्या मिरवणुकीतील ढोल-ताशे जप्त, पोलिसांची कारवाई
हेही वाचा - गणपती विसर्जन 2021 : गिरगाव चौपाटी येथे विसर्जनाची तयारी पूर्ण; 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने घेतला आढावा