कोल्हापूर : बॉलिवूड किंवा असा कोणताही उद्योग ज्यामुळे महाराष्ट्रात नोकऱ्या निर्माण होतील, तो कुठेही नेण्याचे काहीही कारण नाही. शिवाय योगी आदित्यनाथ इथून बॉलिवूड आपल्या राज्यात नेऊ शकत नाहीत. अशाच पद्धतीचा उद्योग आपल्या राज्यामध्ये सुरू करावा, याचा अभ्यास करायला कदाचित योगी आदित्यनाथ मुंबईमध्ये येणार असावेत असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते योगींच्या मुंबई दौऱ्याबाबत बोलत होते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. उद्यापासून आदित्यनाथ यांच्या दौऱ्याला सुरूवात होणार असून, या दौऱ्यात ते मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक आणि बाॅलिवूड सेलिब्रिटींना भेटणार आणि चर्चा करणार आहेत.
मुंबई मधील सुविधा अन्य राज्यात मिळणे अवघड..
एखादा व्यवसाय, उद्योग आपल्या राज्यामध्येसुद्धा सुरू करावा असे वाटणे काही गैर नाही. योगी आदित्यनाथ जर मुंबईमध्ये येऊन इथल्या उद्योजकांशी बोलणार असतील आणि त्यापद्धतीच्या सुविधा निर्माण करून आपल्या राज्यात हा उद्योग सुरू करणार असतील, तर त्यामध्ये शंका उपस्थित करण्याचे काहीही कारण नाही. शिवाय, मुंबईसारखी सुविधा इतर राज्यामध्ये मिळणे अवघड आहे. त्यामुळे तो व्यवसाय इथून दुसऱ्या राज्यात हलविण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
दुसरीकडे योगींची ही भेट म्हणजे मुंबईतील बॉलिवूड उत्तर प्रदेशमध्ये नेण्यासाठीचा कुटील डाव असल्याचे मत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा : बॉलिवूडला साद घालण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत येणार; उद्योजकांशीही करणार चर्चा