कोल्हापूर - राज्यातील मंदिर व सर्व सामान्य लोकांसाठी खुली करण्यात यावी यासाठी भारतीय जनता पक्षाकडून सोमवारी 30 ऑगस्ट रोजी राज्यभर शंखनाद आंदोलन करण्यात आले आहे. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरबाहेर सुद्धा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून शंखनाद आंदोलन करण्यात आले. येत्या चार दिवसात राज्यातील मंदिरं सुरू करावीत अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी आंदोलकांनी दिला. यावेळी अंबाबाई मंदिराबाहेर राज्य सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
फक्त मंदिरं बंद का ?
राज्यासह देशावर कोरोनाचे सावट होते. सर्वांनी नियम पाळत प्रशासनाला सहकार्य केले. गेल्या काही दिवसांपासून आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने सुद्धा हॉटेल, दुकानं, अनेक व्यवसाय सुरू केले आहेत. मग फक्त मंदिरच बंद का असा सवाल भाजपचे प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी केला आहे. शिवाय आज पक्षाच्या आदेशानुसार फक्त शंखनाद आंदोलन केले आहे. पुढच्या चार दिवसांत जर मंदिरं सुरू केली नाहीत तर यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा महाडिक यांनी दिला.
ठाकरे सरकारला नेमकं काय मिळवायचं आहे ?
राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. राज्यातले सर्वच भावीक आता मंदिरं कधी सुरू होणार याची वाट पाहत आहेत. सर्व हिंदुत्ववादी संघटना सुद्धा याबाबत वारंवार सरकारला निवेदन देत आहेत. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने सगळे काही सुरु झाले असताना केवळ मंदिरंच बंद का ? असा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केला आहे. शिवाय मंदिर बंद करून ठाकरे सरकारला नेमकं काय मिळवायचा आहे असा सवाल सुद्धा त्यांनी केला. आम्ही मंदिर सुरू करण्यास भाग पाडू असा इशारा सुद्धा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी दिला. अंबाबाई मंदिरसमोर मंदिर सुरू करण्यात यावी या मागणीसाठी राज्यसरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - जळगावात एकनाथ खडसे भाजपवर बरसले; ईडी चौकशीच्या मुद्द्यावरून व्यक्त केली मनातील खदखद!