कोल्हापूर - महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल अखेर वाजले. येत्या 21 डिसेंबर रोजी निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार असून या दिवशीच प्रभाग रचनेचा आराखडाही प्रसिद्ध केला जाणार आहे. कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये सोडत करण्यात येणार आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबरला संपली होती मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. मात्र, अखेर निवडणुकीचे बिगुल वाजले असून 21 डिसेंबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहेत. महापालिकेचे उप आयुक्त निखिल मोरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेची सभागृहाचे मुदत 15 नोव्हेंबर 2020 रोजी संपली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर महानगरपालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. निवडणुका कधी लागणार याची सर्वजण वाट पाहात होते. मात्र आता आरक्षण सोडतीची तारीख अखेर जाहीर झाल्याने इच्छुकांचे सुद्धा याकडे लक्ष लागून राहिले आहे.
आरक्षण सोडतीचे युट्युब आणि फेसबुकद्वारे लाईव्ह प्रक्षेपण -
आरक्षण सोडत करताना केशवराव भोसले नाट्यगृहांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे गर्दी होऊ नये तसेच कोरोनाचा धोका लक्षात घेऊन सोडतीचे प्रक्षेपण युट्युब आणि फेसबुकद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातूनच ही आरक्षण सोडत पहावी असे आवाहन उप आयुक्त निखिल मोरे यांनी केले आहे.