कोल्हापूर - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ऊसतोड मजुरांचेसुद्धा लसीकरण व्हावे, अशी मागणी भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांनी केली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे.
हेही वाचा - कोल्हापूरकरांसाठी गुडन्यूज.. कोल्हापूर विमानतळावरुन कार्गो वाहतूक सेवेला मंजुरी
मजुरांना रोजगारासाठी आपल्या घरापासून, गावापासून लांब शेकडो किलोमीटर अंतरावर सहकुटुंब स्थलांतरित व्हावे लागते. यापैकी कित्येक लोकांकडे अँड्रॉइड मोबाईल, टीव्ही व इतर माहिती प्रसारणाची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे, बरेचसे लोक सूचनेपासून वंचित राहतात. म्हणूनच अशा सर्वच वंचितांसाठी कारखाना कार्यक्षेत्रावर लसीकरण मोहीम राबवावी, अशी महाडिक यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
महाडिक यांनी निवेदनात म्हटले..
निवेदनामध्ये महाडिक यांनी म्हटले आहे की, सरकारकडून कोविड संबंधित नियमांचे पालन करणे व लसीकरण करण्यासाठी आवाहन केले जात आहे. पण, आजही आपल्या समाजात असे काही घटक आहेत ज्यांच्यापर्यंत आपले हे आवाहन व इतर माहिती म्हणावी तितक्या तीव्रतेने पोहचत नाही. हातावर पोट असणाऱ्या आपल्या समाजातील अशा घटकांकडे आपले हे आवाहन पोचण्याइतकी संसाधनेही उपलब्ध नसावीत. त्यापैकीच ऊस तोड मजूर सुद्धा आहेत. त्यामुळे, त्यांच्यासाठी अनेक आरोग्याच्या सुविधेसह त्यांचे कोरोना लसीकरणसुद्धा व्हावे, असे महाडिक यांनी म्हटले.
मजुरांना आवश्यकतेनुसार बूस्टर डोस उपलब्ध करून द्या -
निवेदनात ते पुढे म्हणाले, ऊस तोडणी मजुरांसाठी कारखाना कार्यक्षेत्रावर लसीकरण मोहीम राबवावी, अथवा कॅम्प आयोजित करावा. जेणेकरून ज्यांनी अजून डोस घेतलेले नाही अशा व्यक्तींना आणि त्यांच्या 15 - 18 वयोगटातील मुलांना पहिला - दुसरा डोस देता येईल. शिवाय या मजुरांना आवश्यकतेनुसार बूस्टर डोसही उपलब्ध करून द्यावा, असेही महाडिक म्हणाले.