कोल्हापूर - एकनाथ शिंदेच्या गटाला आमदारानंतर आता खासदारही जाऊन मिळत आहेत. यामध्ये कोल्हापुरातील 2 खासदारांचा समावेश आहे. हातकणगले लोकसभेचे खासदार धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांचा समावेश असून यामुळे कोल्हापुरातील शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. आमदारांच्या बंडखोरी नंतर शिवसेनेने आमदारांच्या समर्थकांची हकालपट्टी करत नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. मात्र आता खासदार बंड केल्याने संजय मंडलिक यांचे समर्थक मानले जाणारे आणि शिवसेना शहर प्रमुख म्हणून नवीन नियुक्ती झालेल्या सुनील मोदींनी मात्र त्यांच्या सोबत न जाता उद्धव ठाकरेंसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मंडलिक यांच्या कोट्यातून पुणे रेल्वे समितीवरील नियुक्ती झालेल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला असल्याची घोषणा सुनील मोदींनी केली आहे. दोन्ही खासदार एकनाथ शिंदेंकडे जाण्याचा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
'तुमचा वचपा काढल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही' : दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला युवासैनिक आक्रमक झाले असून खासदारांच्या घरावर पुरवलेल्या सुरक्षेवरही शिवसैनिकांनी चांगलाच समाचार घेतला आहे. तर कितीही सुरक्षा लावली तरी शिवसैनिक तुमचा वाचपा काढल्याशिवाय राहणार नाहीत. येत्या निवडणुकीत तुम्हाला मातीमोल करतील, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हा समन्वयक हर्षल सुर्वे यांनी दिली आहे.
'मतदारांमुळे आपण खासदार आहात' : दुसरीकडे आंध्र प्रदेशमध्ये राजकीय सत्तापालटानंतर आज पुन्हा एकदा रेड्डी यांच्या कुटुंबातीलच व्यक्ती मुख्यमंत्री आहे, असे म्हणत शिवसेनेमुळे आणि कोल्हापूरच्या मतदारांमुळे आपण खासदार आहात हे विसरून चालणार नाही, असा सबुरीचा सल्लाही त्यांनी दिला आहे. तर 2024 ला मतदार राजा बंडखोर खासदारांना अदृश्य भूकंपाचा धक्का देईल, असा इशाराही शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिला आहे.