कोल्हापूर - दररोजच घरफोडी, चोरीच्या घटनांबाबत आपण रोजच वाचत, ऐकत असतो. मात्र, कोल्हापुरात चक्क कांद्याची चोरी झाली आहे. कोल्हापुरातील मार्केट यार्डमधील एका गोडाऊनमधून तब्बल 9 पोती कांदा चोरीला गेला असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या वाढलेल्या दरामुळे ही घटना घडली आहे. चोरीची ही घटना प्रकाश ट्रेडिंग यांच्या गोडावूनमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मिळालेल्या महितीनुसार, मार्केट यार्ड मधील प्रकाश ट्रेडिंग दुकानातून दररोज कांदा, बटाट्याची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. दुकानाच्या समोरच कांदा, बटाट्याची पोती ठेवलेली असतात. मात्र, रात्री काही चोरट्यांनी कांद्याची जवळपास 9 पोती त्यांच्या गोडावूनमधून लंपास केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
व्यापाऱ्यांनी तत्काळ याबाबत शाहूपुरी पोलीस ठाणे गाठत संबंधित चोरट्यांविरोधात तक्रार दिली आहे. या घटनेमुळे महाग झालेला कांदा आता चोरट्यांच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे कांद्यासोबतच लसूण आणि बटाट्याचीही चोरट्यांनी काही पोती लंपास केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा - शाहूवाडी तालुक्यात 3 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी