कोल्हापूर - राज्यात सर्वत्र संचारबंदी सुरू आहे. अत्यावश्यक सेवा सोडून कोणीही घराबाहेर पडू नये, असे आदेश असतानाही नियमांचे उल्लंघन करून बाहेर पडणाऱ्यांवर कोल्हापूर पोलिसांनी गेल्या 3 दिवसांपासून मोठी कारवाई सुरू केली आहे. सोमवारी दिवसभरात नाकाबंदीदरम्यान, तब्बल 4 लाखांचा दंड वसूल करण्यात आला होता. मंगळवारी मात्र यामध्ये वाढ झाली असून नागरिक अजूनही मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्ट होत आहे. मंगळवारी जिल्ह्यात 2 हजार 200 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर 272 वाहने सुद्धा जप्त करण्यात आली आहेत.
कालच्या तुलनेत रस्त्यावर कमी नागरिक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा कडक निर्बंध घालण्यात आले असून केवळ अत्यावश्यक सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या नाकाबंदीमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची काही प्रमाणात गर्दी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून जवळपास 6 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
आज अशी झाली कारवाई
विना मास्क - 418 जणांवर कारवाई
विना मास्क दंड - 1 लाख 11 हजार 900 रुपये
विनाकारण वाहन घेऊन घराबाहेर पडलेले - 2 हजार 200
एकूण वाहने जप्त - 272
विनाकारण वाहन घेऊन घराबाहेर पडलेल्यांकडून वसूल केलेला दंड - 4 लाख 84 हजार 500 रुपये
हेही वाचा - दहावीची परीक्षा रद्द, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा