कोल्हापूर - छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय म्हणजेच सीपीआरमधील 34 डॉक्टर ( CPR Doctors Transfered To Sindhudurga ) पुन्हा सिंधुदुर्गला हलवण्यात आले आहेत. यामुळे कोल्हापूरची रुग्णसेवा खिळखिळी ( Kolhapur Health Service Distrube ) बनली असून नागरिकांनी याला आता विरोध करण्यास सुरुवात केली आहे. डॉक्टरांच्या या बदल्या तत्काळ थांबवा, अन्यथा उग्र आंदोलन करू, असा इशारा भाजपसह अन्य संघटनानी दिला आहे. केवळ नारायण राणे ( Narayan Rane ) यांना शह देण्यासाठी सिंधुदुर्गमध्ये वैद्यकीय महाविद्यालय ( Sindhudurga Medical Hospitals ) सुरू करण्याचा घाट घातल्याचा आरोपदेखील होत आहे. तर दुसऱ्या बाजूला कोल्हापुरात तीन तीन महत्वाची पद असलेले मंत्री असतानादेखील एकाने ही याला विरोध का केला नाही, असा संतप्त सवाल नागरिकांन मधून विचारला जात आहे.
'रुग्णालय बंद पडणार की काय?' -
छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयमध्ये गोरगरीब नागरिक हे मोठ्या प्रमाणात उपचार घेण्यासाठी येत असतात. प्रामुख्याने यात कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचार घेतात. दरम्यान, या डॉक्टरच्या बदल्यामुळे रुग्णालयातील अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार यावर ताण येत असून रुग्णालय बंद पडणार की काय, असा सवाल रुग्णांनी व आंदोलकांनी केला आहे. आरोग्यराज्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या जिल्ह्यामध्येच असा बदल्यांचा खेळ होत असेल, तर आरोग्यमंत्र्यांनी यमध्ये त्वरित लक्ष घालून सीपीआर वाचवावे, अशी मागणी सीपीआर बचाव कृती समितीकडूनदेखील होऊ लागले आहेत. जिल्ह्यातील या सीपीआर रुग्णालयामध्ये सध्या जवळपास 50 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सुमारे 90 डॉक्टर नसल्यामुळे सीपीआर रुग्णालय पूर्ण खिळखिळे झाले आहे. त्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होऊ लागले आहेत.
सर्वसामान्यांचा आधारवड म्हणजे 'सीपीआर' -
सर्वसामान्यांचा आधारवड असणाऱ्या सीपीआरमधील रुग्णसेवेवर सध्या विपरित परिणाम होताना दिसत आहे. कारण सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी कोल्हापुरातील सीपीआरमधील वैद्यकीय महाविद्यालयातील ३४ डॉक्टरांना पळवण्याचा घाट घातला जात आहे. अशा प्रकारचे आदेशदेखील देण्यात आले आहेत. यामुळे सीपीआरमध्ये डॉक्टरांचा अभाव जाणवू लागला आहे. अनेक शस्त्रक्रियाही पुढे जात आहेत. गेल्या काही अठवड्यांपूर्वीच कोकणात गेलेले सर्व डॉक्टर सीपीआरमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे 15 दिवस पुढे गेलेल्या शस्त्रक्रियांचे वेळापत्रक ठरवून त्यानुसार प्रत्येक रुग्णांस फोन करून बोलवून घेऊन शस्त्रक्रिया केल्या जात होत्या, म्हणून हळूहळू का होईना सीपीआरमधील वेळापत्रक पूर्वपदावर येत होते. मात्र, आता पुन्हा हे ३४ डॉक्टर्स कोकणात जाणार असल्यामुळे आता या शस्त्रक्रिया पुन्हा रखडणार आहेत. एका नवीन महाविद्यालय चालू करण्याच्या निमित्ताने पाचव्यांदा कोल्हापूरच्या ३४ डॉक्टरांना पाठवून कोल्हापूरवर महाविकास आघाडीचे नेते अन्याय का करत आहेत, अशी विचारणा होत आहे.
'महाविद्यालय बंद पाडणे हे योग्य नाही' -
कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमधील 34 डॉक्टर प्राध्यापक सिंधुदुर्गला हलवण्याचे आदेश सरकारने दिले आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, राज्य शासनाची भूमिका म्हणजे कोल्हापुरातील आरोग्य यंत्रणाही खिळखिळी करण्याचे सुरू आहे. सिंधुदुर्गात एखादा नवीन महाविद्यालय चालू करत असाल तर जाहिरात काढून नवीन भरती करून घ्यावी. नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी जुने आणि प्रतिष्ठित महाविद्यालय बंद पाडणे हे योग्य नाही असे ते म्हणाले आहेत.
'हे वैद्यकीय महाविद्यालय कधीच बंद पडू देणार नाही' -
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, याबाबत मी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला जर नवीन सर्व महाविद्यालयातून थोडे थोडे डॉक्टर प्राध्यापक घ्यावे. दिग्विजय खानविलकर यांनी चालू केलेले हे वैद्यकीय महाविद्यालय आहे, याला आम्ही कधीच बंद पडू देणार नाही.
काय आहे प्रकरण -
गेल्या काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते उद्घाटन करत वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. त्यानंतर राणे आणि महविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादामुळे महाराष्ट्र शासनानेही जिद्दीला पेटून त्वरित शासकीय महाविद्यालय मंजूर केले. मात्र, मुलभूत सोयी-सुविधा आणि मनुष्यबळ नसल्याने राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने या महाविद्यालयाच्या अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी नकरली होती. परंतु परवानगी मिळावी म्हणून राजकीय इर्ष्येपोटी पुन्हा अर्ज करण्यात आले. यासाठी मनुष्यबळ वाढवण्यासाठी कोल्हापूरच्या ३४ डॉक्टरांना तात्पुरते सिंधुदुर्गला नियुक्त करण्यात आले आहे.
सीपीआरमधील ४९ जणांना कोरोनाची बाधा -
गेल्या काही दिवसांमध्ये सीपीआरमधील अनेक डॉक्टर कोरोनाच्या कचाट्यात अडकले आहेत. वैद्यकीय अधिकारी कर्मचारी , डॉक्टर अशा ४९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे यासर्वांवर घरातून आणि दवाखान्यातून उपचार सुरु आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणावर डॉक्टर्स बाधित झाल्याने सीपीआरच्या रुग्णसेवेवरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. त्यात पुन्हा ३४ डॉक्टर सिंधुदुर्गला पाठवण्याचे आदेश आल्याने येथे रुग्णांना सेवा देणे दिवसेंदिवस कठीण होत जात आहे. याकडे जिल्ह्यातील मंत्री लक्ष देणार आहेत का नाही का सीपीआर ला पूर्णपणे बंद पडून राजकीय लाभ घेण्याचा हा घाट कोण घातला आहे असा संतप्त सवाल जिल्ह्यातील संघटनाकडून विचारले जात आहे.
केंद्रीय मंत्री भारती पवार यांची पाठ फिरताच पुन्हा डॉक्टर्सना आदेश -
कोरोना काळात इतर आजार असणाऱ्या रुग्णांची हेळसांड झाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला होता, याची तक्रार भाजपाचे ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आनंद गुरव यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे केली. या तक्रारीवरून अधिकाऱ्यांना चांगलीच समज दिली होती. रुग्णांसाठी नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर मी सहन करणार नाही, अशा शब्दात भारती पवार सुनावले होते. यानंतर त्वरित यंत्रणा जागी झाली. सिंधुदुर्गात पाठविलेल्या सर्व डॉक्टर्सना पुन्हा सीपीआरमध्ये बोलावण्यात आले होते. मात्र, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची पाठ फिरताच पुन्हा नव्याने आदेश काढत डॉक्टर्स आणि प्राध्यापकांना सिंधुदुर्गात बदली केली जात आहे.