कोल्हापूर : पॅन कार्ड किंवा कोणतेही ओळखपत्र, कागदपत्र नसणाऱ्या 18 वर्षांवरील तब्बल 1 हजार 591 जणांनी शुक्रवारी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. शुक्रवारी ज्यांच्याकडे कोणतीही कागदपत्र नाहीत किंवा बेघर, भटके, फिरस्ती, मजूर, कामगार ज्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत त्यांच्यासाठी आरोग्य विभागाने ही विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्याला मोठा प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळाला. यामध्ये हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक 557 जणांचे लसीकरण पार पडले.
गगनबावडा, राधानगरी मध्ये सर्वात कमी प्रतिसाद
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य संस्था यांच्यामार्फत ज्या नागरिकांकडे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा कोणतेही कागदपत्र नाही अशा लाभार्थ्यांसाठी शुक्रवारी रात्री 9 पर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या डोस करता ऑन स्पॉट रजिस्ट्रेशनद्वारे लसीकरण करण्यात येणार होते. ज्या नागरिकांकडे ओळखपत्र नाही अशा नागरिकांनी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले होते. प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले. यामध्ये सर्वाधिक हातकणंगले तालुक्यात 557 तर सर्वात कमी गगनबावडा 8 आणि राधानगरी 21 इतक्या जणांचे लसीकरण झाले.