ठाणे - कल्याण पूर्वेतील एका घरात घरगुती गॅस सिलिंडरचा भयानक स्फोट होऊन दोन घरे आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे. ही घटना कल्याण-ठाकुर्ली मार्गावरील असलेल्या कृष्णानगर येथील नेतवली टेकडीवर घडली आहे. गॅस सिलिंडरचा स्फोट एवढा तीव्र होता की, परिसरातील इतरही घरांना त्याचे हादरे बसल्याचे सांगण्यात येत आहे.
वेळीच घराबाहेर पडल्याने कुटुंब बचावले
कल्याण पूर्वेतील कचोरे गावात असलेल्या कृष्णानगर येथील नेतवली टेकडीवर नवनीत भुरिया आणि संतोष भुरिया हे दोघे भाऊ आजूबाजूस असलेल्या घरात कुटूंबासह राहतात. रविवारी (दि. 3 जाने.) दुपारच्या सुमारास अचानक एका घरातील सिलिंडरमधून गॅस गळती होऊन आगीचा भडका उडाला. हे पाहताच घरातील सर्व कुटुंबानी बाहेर पळ काढला होता. त्यामुळे या घटनेत कोणाही दुखापत झाली नाही. मात्र, त्या भडक्यामुळे गॅस सिलिंडरने पेट घेतल्याने जोरदार स्फोट होऊन दोन्ही घराची राख रांगोळी झाली होती.
संसारोपगी साहित्याची राख रांगोळी
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर अर्ध्यातासाच नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत दोन्ही घरातील संसार उपयोगी साहित्याची राख रांगोळी झाली होती. तर या आगीचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाराने सांगितले. दुसरीकडे या घटनेमुळे परिसरात लागूनच असलेल्या घरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा - चोरट्याचा पाठलाग करताना थोडक्यात बचावला, थरार सीसीटीव्हीत कैद
हेही वाचा - काल्हेरच्या शिवसेना शाखा प्रमुखावर गोळीबार; घटना सीसीटीव्हीत कैद