ठाणे - कल्याण डोंबिवलीत मागील 6 ते 7 महिन्यात विविध गुन्ह्यांमध्ये लंपास केलेले 28 महागडे मोबाइल पुन्हा मालकांच्या ताब्यात देण्यात खडकपाडा पोलिसांना यश आले आहे. आज हे मोबाइल नागरिकांना परत देण्याचा छोटीखानी कार्यक्रम पोलीस परिमंडळ - 2 कल्याण विभागीय कार्यलयात पार पडला. यावेळी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी अधिक माहिती दिली.
आधुनिक युगात पोलिसांनीही डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर सुरू केला आहे. याच तंत्राच्या मदतीने पोलिसांनी चोरीला गेलेल्या मोबाइलचा कोड नंबर, युजर आयडी ट्रॅक केला. यामध्ये मुंबई, ठाणे यांसह कर्नाटक राज्यातूनही काही मोबाइल हस्तगत करण्यात आल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी दिली आहे.
दिवाळीत मोबाइल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंद
कल्याण - डोंबिवली शहरात मोबाइल चोरीच्या तक्रारीत मागील 2 वर्षांत कमालीच्या वाढल्या आहेत. यासंबंधी गुन्ह्यांचा तपास करताना पथकातील खडकपाडा पोलिसांनी 4 लाख 25 हजार किंमतीचे 2019-2020 साली चोरीला गेलेले 28 मोबाइल हस्तगत केले. त्यामुळे दिवाळाच्या दिवशी मोबाइल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या छोटीखानी कार्यक्रमाला अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, सहाय्यक आयुक्त अनिल पोवार उपस्थित होते. तर खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे हवालदार सुनील पवार यांच्या टीमने ही उल्लेखनीय कामगिरी केल्याची माहिती उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.