ठाणे - मालकिणीच्या दागिन्यावर डल्ला मारणाऱ्या विश्वासू मोलकरणीचा पर्दाफाश करण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. उर्मिला जितेंद्र कदम (वय 26 रा. डोंबिवली त्रिमूर्ती नगर) असे चोरट्या महिलेचे नाव आहे. तिला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला पोलीस कोठडी ठोठावली आहे.
डोंबिवलीजवळील 90 फुटी रस्त्यावर असलेल्या ठाकुर्लीतील मंगेशी डझल अपार्टमेंटमध्ये काबरा कुटुंबीय राहतात. गोपाल काबरा यांच्या पत्नीचे दागिने बेडरूममधील लाकडी कपाटात लॉकरमध्ये ठेवण्यात आले होते. या दागिन्यांकडे काबरा कुटुंबीयांनी दोन महिने लक्ष दिले नव्हते. मात्र, दोन जुलैला दागिने पाहण्यासाठी लॉकर उघडले. यावेळी त्यांना धक्काच बसला. दागिने चोरी झाल्याची खात्री पटल्यावर त्यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. चोरीला गेलेले एक लाख रुपयांचे दागिने चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला.
विशेष म्हणजे काबरा आणि त्यांची पत्नी दोघेही इंजिनियर आहेत. यामुळे ते नोकरीनिमित्त घराबाहेर असतात. त्यांच्या घराच्या मुख्य दर्शनी भागातील दरवाजाच्या लॉकच्या तीन पैकी एक चावी तीन महिन्यापूर्वी हरवली होती. परंतु दागिने चोरीची घटना दरवाजाचे लॉक किंवा कडी तोडून झाली नव्हती. त्यामुळे नक्कीच चोर कोण ? हे काबरा कुटुंबीयांच्या लक्षात येत नव्हते. सदर घरफोडीचा गुन्हा कल्याण गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यावर कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. काबरा कुटुंबाचे विश्वासू मोलकरीण उर्मिलावर संशय गेला. उर्मिला ही गेल्या सात ते आठ महिन्यापासून या कुटुंबाकडे धुणे-भांड्याचे काम करते. तिला आकर्षक पगारही दिला जात होता. त्यामुळे संशय आल्याने तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे उडवाउडवीची उत्तरे देत होती. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, काबरा कुटुंबाच्या घरातून चोरीला गेलेली चावी तिने चोरल्याचे उघड झाले. त्यानंतर तिने 2 महिन्यापूर्वी काबरा कुटुंब घरी नसताना बेडरूममधील कपाटाचे लॉकर उघडून सर्व दागिन्यांवर डल्ला मारून लंपास केले. त्यानंतर चोरलेले दागिने तिने डोंबिवलीतील गोग्रासवाडी येथील पूजा ज्वेलर्स या दुकानात पन्नास हजार रुपयाला विकल्याची कबुली तिने पोलिसांना दिली. आता गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी उर्मिलाला डोंबिवली पोलिसांच्या ताब्यात दिले. या मोलकरणीने आतापर्यंत किती ठिकाणी अशा घरफोड्या केल्या आहेत, याची सखोल चौकशी पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.