कल्याण (ठाणे )- ठाणे जिल्ह्यात सध्या कोरनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्याच प्रमाणे कल्याण, डोंबिवलीत देखील कोरोनाबाधितांची आकडेवारी शेकडोंच्या घरात वाढ होताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील विविध 33 कंटेनमेंट झोनमध्ये (प्रतिबंधित क्षेत्रात) केडीएमसीने कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच या क्षेत्रांपुरता लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
कल्याण-डोंबिवलीतील प्रभाग क्षेत्रानुसार या कंटेनमेंट झोनची आखणी करण्यात आली असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वांसाठी याठिकाणी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये शुक्रवारपासून 300 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी या 33 ठिकाणी शिथिल करण्यात आलेले नियम रद्द करत कडक नियमावली लागू करण्यात आली आहे.
असे आहेत निर्बंध…
- मेडीकल, रुग्णालये, क्लिनिक, एलपीजी गॅस सिलेंडर पुरवठा यासाठी हे निर्बंध लागू नसतील.
- दूध-दुग्धजन्य पदार्थ, बेकरी, डेअरी, किराणा मालाची दुकाने, भाजीपाला आदींसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुभा..
- दूधविक्रीसाठी पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत परवानगी..
- जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व आणि कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश
- कंटेनमेंट झोन हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारची प्रवासी वाहतूक आणि नागरिकांच्या येण्या-जाण्यावरही प्रतिबंध
- केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहने आणि व्यक्तींना सूट देण्यात आली आहे.
- बेकरी, दूध डेअरी, किराणा दुकानदार याना काऊंटरवर विक्री करण्यास बंदी, होम डिलिव्हरीद्वारे या वस्तू देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- भाजीपाला विक्री ही एका ठिकाणी बसून न करता फिरते राहून करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, लॉकडाऊन जाहीर केलेल्या या परिसराच्या सीमांचे नियमन अत्यंत काटेकोरपणे करण्याबाबत संबंधित प्रभागक्षेत्र अधिकारी, तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याचे निर्देशही केडीएमसीने दिले आहेत. तर या कंटेनमेंट झोनमधील नियमांचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिले आहेत.