ठाणे - कल्याण डोंबिवली पाठोपाठ उल्हासनगर महापालिकेलादेखील ब्रिटनहून परतलेल्या नागरिकांचा शोध घ्यावा लागत आहे. उल्हासनगर येथे परतलेल्या 12 नागरिकांची यादी दोन दिवसांपूर्वी पाठवण्यात आली. शासनाच्या निर्देशानुसार उल्हासनगर महापालिकेने ब्रिटनहून आलेल्या नागरिकांची चाचणी सुरू केली आहे. या 12 नागरिकांपैकी एक सात वर्षांची मुलगी पॉझिटिव्ह आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. या बाधित मुलीची प्रकृती स्थिर असून ती कुटुंबासह 7 डिसेंबर रोजी उल्हासनगर येथे नातेवाईकांकडे आली होती. तिच्या कुटुंबाची तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
बाधित मुलीला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. रिपोर्ट जीन टेस्ट (जनुकीय रचना) तपासणीसाठी मुंबईतून पुण्याच्या एनआयव्ही येथे पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर 'युकेचा स्ट्रेन' आहे की नाही, या तपासणीसाठी सॅम्पल पुण्याच्या लॅबमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
चार दिवसांपूर्वीच कल्याण डोंबिवलीतील दोन महिला पॉझिटिव्ह
विमानतळावर प्रवाशाची सर्व माहिती गोळा करून त्या त्या महापालिकांना या प्रवाशाची माहिती पाठवत प्रवाशांच्या स्वॅबची तपासणी करण्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. चार दिवसांपूर्वीच कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबरपर्यंत 55 नागरीक ब्रिटनहून आल्याची यादी शासनाकडून धाडण्यात आली. या नागरिकांची नावं, पत्ते, फोन नंबरची यादी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे धाडण्यात आली असून या नागरिकांना संपर्क करून त्यांची पुन्हा टेस्टिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार तपासणी करण्यात आली. महिला प्रवासी पॉझिटिव्ह आल्याने तिचे जीन टेस्टिंगसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
नव्या विषाणूला रोखण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूने थैमान घातल्यानंतर हा विषाणू भारतात पसरू नये यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय विमानं सुरू असल्याने ब्रिटनमधून येणाऱ्या नागरिकाची संख्या मोठी आहे. या नागरिकांची विमानतळावर उतरल्यानंतर तपासणी करत लक्षणे आढळणऱ्यांना विलगीकरणात पाठवले जात आहे. ज्या प्रवाशांना लक्षणे नाहीत, त्यांना होम क्वारंटाइनचा सल्ला दिला जात आहे.