ठाणे - कॅलिफोर्निया येथे दोन डोस घेतलेल्या मुलांना शाळेत बसण्याची परवानगी आहे तर महाराष्ट्रात हातावर पोट असलेल्यांना चाकरमान्यांना लोकल प्रवासास परवानगी का नाही, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. ते रविवारी (दि. 11 जुलै) डोंबिवली येथे झालेल्या पत्रकार परिषेदत बोलत होते.
दरेकर म्हणाले, कर्जत ते कसारा मार्गावर मोठ्या प्रमाणात हातावर पोट असणारा चाकरमानी वर्ग राहतो. त्यांना आपल्या उदरनिर्वाहसाठी ठाणे, मुंबई येथे जाणे गरजेचे असते. त्यामुळे दोन डोस झालेल्यांना लोकल रेल्वे प्रवासासाठी मुभा द्यावी, याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असून रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरवठा करणार आहे. यासाठी तीव्र आंदोलन करु, वेळ आल्यास रेल्वे रोको आंदोलनही करू, असे दरेकर म्हणाले.
...विकास आता नाही तर कधी
परिषदेत विधान परिषद विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर यांनी कल्याण-डोंबिवलीतील रखडलेल्या विकास कामांबाबत शिवसेनेवर सडकून टीका केली. यावेळी दरेकर म्हणाले, युतीचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीत स्वतः लक्ष घालत होते. मात्र, महाविकास आघाडी सरकार आल्यापासून विकास खुंटला आहे. सध्या विकास कामे करण्यासाठीचा सुवर्ण काळ आहे. कारण, कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. यामुळे महापालिका शिवसेनेची, खासदार, नगरविकास मंत्री, रस्ते खाते व मुख्यमंत्रीही शिवसेनेचेच आहेत. यामुळे कल्याण-डोंबिवली भागाचा विकास आता नाही तर कधी होणार, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - अटगावजवळ रेल्वे ट्रॅकवर घुसला गॅस टँकर; मोठी दुर्घटना टळली