ठाणे - एका अल्पवयीन मुलीला बिस्कीटचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या एका नराधमाला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. आस्टूरकर यांनी २० वर्षे कारावासाची शिक्षा आणि २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी एक वर्ष कारावासाची शिक्षा होईल असही आदेशात म्हटले आहे. सात वर्षापूर्वी हा प्रकार डोंबिवलीत घडला होता. या प्रकरणात अटक झाल्यापासून आरोपी आधारवाडी तुरुंगात होता. या तरुणाच्या कृत्याबद्दल न्यायालयाने तीव्र खेद व्यक्त आरोपीला कारावासाची शिक्षा ठोठावली. शंकर उर्फ राहुल वसंत पेटकर अशी कारावासाची शिक्षा झालेल्या नराधमाचे नाव आहे.
आरोपीच्या घरात पीडितेवर बलात्कार - पीडित मुलगी मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत राहत असलेल्या आपल्या घरा जवळील सार्वजनिक ठिकाणच्या नळ कोंडाळ्यावर पाणी भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी नळावर पीडित मुलगी एकटीच होती. नळ कोंडाळ्याच्या बाजुला आरोपी राहुलचे घर होते. नळावर कोणीही नाही आणि आपल्या घरात कोणीही नाही असा विचार करून राहुलने पीडित मुलीवर बलात्कार केला. राहुलने पीडित मुलीला घरात आली तर बिस्किट देतो असे आमीष दाखविले. पीडित मुलगी आरोपी राहुलला मामा टोपण नावाने हाक मारायची. राहुलच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन मुलगी राहुलच्या घरात गेली. तेथे पीडित मुलीला काही कळण्याच्या आत राहुलने मुलीवर बलात्कार केला. घडल्या प्रकाराने मुलगी घाबरली. हा प्रकार कोणाला सांगू नको म्हणून राहुलने पीडितेला धमकी दिली होती.
सात वर्षापासून न्यायालयात सुरू होता खटला - नराधम राहुलने केल्या प्रकाराबद्दल भयभीत झालेल्या पीडित मुलीने घरी आल्यानंतर आई, वडिलांना घडला प्रकार सांगितला. ते हा प्रकार ऐकून त्यांना धक्काच बसला. त्यानंतर पालकांनी पीडित मुलीला तत्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात नराधम राहुल विरोधात तक्रार नोंदविण्यासाठी गेले. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून राहुल विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधित कायदा, बलात्कार कायद्याने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात कोणत्याही त्रृटी राहणार नाही अशी काळजी तपास अधिकारी महिला उपनिरीक्षक गंधास यांनी घेतली. आरोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर सात वर्षापासून न्यायालयात हा दावा सुरू होता.
आरोपीला शिक्षा सुनावण्यात पोलिसांचे सहकार्य - अलीकडच्या सुनावणीत हे प्रकरण धसास लागण्यासाठी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी प्रयत्न केले. तर, या सरकारी वकील ॲड. कदंबिनी खंडागळे यांनी पीडित मुलीची बाजू प्रभावीपणे न्यायालयात मांडली. मानपाडा पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक ए. एस. गंधास यांनी या प्रकरणाचा कसून तपास करून आरोपपत्र कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले होते. मानपाडा पोलीस ठाणे आणि न्यायालय यांच्यातील समन्वयक म्हणून हवालदार ए. आर. गोगरकर यांनी काम पाहिले. हुकूम पोहचविण्याचे काम पी. के. बाशिंगे, एन. जी. आव्हाड यांनी केले.
हेही वाचा - Panchganga: पंचगंगा इशारा पातळी गाठण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना