औरंगाबाद - उद्यानातील माती घेण्यावरून दोन तरुणी भांडत असल्याची माहिती दामिनी पथकाला मिळाली. हे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दामिनी पथकातील महिला पोलिसांवर दोघी बहिणींनी हल्ला चढवला. ही घटना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील अण्णाभाऊ साठे चौकात असलेल्या नेहरु उद्यानाजवळ घडली आहे. शुभांगी आकाश कारके (२१) व निशा आकाश कारके (१९, दोघीही रा. फाजलपुरा, एसटी कॉलनी) अशी मारहाण केलेल्या दोन्ही बहिणींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील नेहरु उद्यानातील माती घेण्यावरून दोन तरुणी उद्यान सांभाळणाऱ्या महिलेशी भांडत असल्याची माहिती दामिनी पथकाला सायंकाळी साडेचारच्या सुमारास मिळाली होती. त्यामुळे दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, महिला शिपाई आशा गायकवाड, लता जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेतली. कारके या दोघी बहिणी भांडण करत होत्या. त्यांची समजूत काढण्याचा दामिनी पथकाने प्रयत्न केला. मात्र, अचानक कारके बहिणींनी शिपाई आशा गायकवाड यांच्या हातातील काठी हिसकावून घेत त्यांनाच मारहाणीला सुरूवात केली. हा प्रकार पाहुन अवाक् झालेल्या दामिनी पथकातील उपनिरीक्षक उमाप व लता जाधव यांनी दोघींना रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने दोघींनी उपनिरीक्षक उमाप व जाधव यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. याप्रकारानंतर पोलिसांचा फौजफाटा मागवत दोघींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुध्द बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक विशाल बोडखे करत आहेत.
हेही वाचा - समलैगिंक संबंधांची मागणी करणाऱ्या मित्राचा मित्राने केला खून