औरंगाबाद - मराठी शाळा टिकवण्यासाठी आता साहित्यिक आंदोलन करणार आहेत. औरंगाबादच्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात साहित्यिकांची बैठक पार पडली. या बैठकीत आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
मराठी भाषा जगणं गरजेचं आहे. त्यामुळे मराठी शाळांना परवानगी द्यावी आणि मराठी शाळांना अनुदान द्यावे, अशी मागणी साहित्यिकांनी केली आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व साहित्याकांसह पत्रकार आणि इतर संघटना सहभागी होणार असल्याची माहिती औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत देण्यात आली. या बैठकीला मराठी भाषांचा सन्मान करणाऱ्या प्रत्येकाला आमंत्रित करण्यात आले होते. मात्र मराठी भाषेच्या नावावर राजकारण करणाऱ्या संघटनांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.
राज्यात दिवसेंदिवस मराठी शाळांचा टक्का कमी होत चालला आहे. मराठी शाळांना अनुदान मिळत नसल्याने शाळांच्या संख्येत घट होत आहे. परिणामी मराठी शाळा हळूहळू कमी होत आहेत. अनेक शाळा बंद पडल्यात, तर अनेक शाळा लवकर बंद पडतील, अशी स्थिती आहे. राज्यातील साहित्यिक आणि पत्रकारांसह मराठी भाषेचा सन्मान करणारे लोकं आंदोलनात सहभागी होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले आहे.