औरंगाबाद - विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक होत नसल्याचा आरोप करत एका महिलेने चक्क पोलीस उपायुक्तांच्या दालनात विष घेतल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला आहे. पोलिसांनी घटनेनंतर तातडीने महिलेला औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
हेही वाचा... संतापजनक! बापाकडून मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार, पीडिता गर्भवती..
होळीच्या दिवशी सदरील महिलेचा विनयभंग झाला होता. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपीला अटक होत नसल्याने महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे उपस्थितांचे म्हणणे आहे.
हेही वाचा... कोरोना कहर : मंत्रालयात आता 'जनता प्रवेशबंदी', कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंद
विषप्राशन केलेली महिला आणि तिच्या सावत्र भावांमध्ये कौटुंबिक वाद आहेत. याआधी दोनही कुटुंबीयांमध्ये भांडण झाले होते. त्यानुसार दोन्ही कुटुंबीयांमध्ये परस्परांच्या विरोधात तक्रार देण्यात आल्या होत्या. मात्र, होळीच्या दिवशी महिलेच्या सावत्र भावाने विनयभंग केल्याची तक्रार महिलेने वाळूज पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप करत महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तक्रार दिली. तरीही आरोपींना अटक होत नसल्याने पीडित महिलेने पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांच्या दालनात आपले म्हणणे मांडत असताना अचानक विषाची बाटली काढून विष घेतले.
पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ विषाची बाटली महिलेच्या हातातुन ओढून घेतली. त्यानंतर महिलेला औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मारहाण प्रकरणी तिघांना आणि विनयभंग प्रकरणी एकाला अटक केली आहे.