औरंगाबाद - राज्यात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत असताना, कोरोनाच्या लसींचा तुटवडा सर्वत्र जाणवत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पुढचे दोन दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारपर्यंत नवीन साठा उपलब्ध होईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे असलेला साठा संपला तर लसीकरण मोहिमेला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात 57 हजार लसींचा साठा
लसींचा साठा संपल्याने राज्यात अनेक ठिकाणी लसीकरण मोहीम थांबवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवस पुरेल इतका साठा शिल्लक आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 57 हजार लस शिल्लक असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. महानगरपालिकेकडे 23 ते 24 हजार कोविशील्डच्या तर 900 डोस कोव्हॅक्सचे शिल्लक आहे. तर जिल्हापरिषदेकडे 33 हजार डोस शिल्लक आहेत. हा साठा पुढील दोन ते तीन दिवस पुरेल, राज्य सरकारला आणखी लसींचा साठा मागितला असून, तो लवकरच उपलब्ध होईल अशी शक्यता असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
जिल्ह्याला मिळाल्या होत्या सव्वातीन लाख लसी
औरंगाबाद जिल्ह्याला आतापर्यंत सव्वातीन लाख लसी मिळाल्या आहेत. ग्रामीण भागात 100 तर शहरी भागात 67 लसीकरण केंद्राच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येत आहे. एखाद्या केंद्रावर लसीचा तुटवडा जाणवला तर आसपासच्या लसीकरण केंद्रातून लस उपलब्ध करण्यात येत आहे. शहरात रोज पाच हजारांच्या जवळपास लसीकरण होत आहे. लवकरच लसीचा साठा उपलब्ध होईल. त्यामुळे लसीकरण मोहीम चालू राहील अशी अपेक्षा मनपा आरोग्य अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - मुंबईत लसीचा तुटवडा; 30 हुन अधिक केंद्र बंद