औरंगाबाद - कोरोनाचा संसर्ग हळूहळू वाढताना दिसत आहे. शहरातील आणखी दोन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आलं आहे. आता कोरोनाबाधितांची संख्या 20 वर पोहचली आहे. त्यात एकचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे. तर, एका रुग्णाला उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले आहे.
शहरातील हडको एन-११ भागातील यादवनगरमध्ये राहणारा एक २९ वर्षीय युवकाला तर सातारा-देवळाई परिसरात राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकाच दिवशी रुग्णसंख्या दोनने वाढली आहे. त्यामुळे औरंगाबादची कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या आता २० वर पोहोचली आहे.
शुक्रवारी दिवसभर एकही पॉसिटीव्ह रुग्ण आढळून आले नसल्याने थोडा दिलासा समजला जात होता. मात्र रात्री उशिरा दोघांचे अहवाल प्राप्त झाल्याने दोन जणांना नव्याने लागण झाल्याच आढळून आलं. शुक्रवारी चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालय विशेष कोरोना रूग्णालयात ७५ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १३ जणांमध्ये कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्यामुळे त्यांना घरातच अलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे. या रुग्णालयात ५७ नवीन रुग्णांना भरती करण्यात आले होते.
कोरोनाचा संसर्ग असताना सारीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पंधरा दिवसात सारीमुळे 11 जणांचे बळी गेले आहेत. तर जिल्ह्यात सरीच्या रुग्णांची संख्या 137 वर पोहचली असल्याने कोरोनासोबत सारीचा संसर्ग थांवण्याचं आवाहन प्रशासनापुढे आहे.