औरंगाबाद - स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. किशोर भटू जाधव (वय २९. रा. वाघाडी खुर्द ता. सिंदखेडा, जी. धुळे)असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या तरुणाचे आत्महत्येचे कारण समोर आले आहे. या तरुणाची औरंगाबादमध्ये स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना येथील एका मुलीशी मैत्री झाली. यामध्ये त्याने या मैत्रिणीला बहीण मानले. त्या मैत्रिणीने किशोरकडून पैशे घेतले होते. मात्र, पैशे देण्याची वेळ आल्यावर या मैत्रिणीने आपल्या पोलीस प्रियकराच्या मार्फत त्याला खोट्या गुन्हात अडकवण्याची धमकी दिली. त्यानंतर तो तणावात होता अशी माहिती समोर आली आहे.
पोलीस प्रियकराच्या मदतीने दिली धमकी
किशोरची येथे स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना येथील एका मुलीशी मैत्री झाली. यामध्ये त्याने या मैत्रिणीला बहीण मानले. पुढे विश्वास संपादन केल्यानंतर त्या मैत्रिणीने आपली आई आजारी असल्याचे कारण सांगून त्याच्याकडे सात लाख रुपये मागितले. त्यानेही मुंबईतील अधिकारी मैत्रिणीकडून उसने पैसे घेऊन तीला दिले. मात्र, पैसे परत करण्याची वेळ येताच मानलेल्या बहिणीने पोलीस असलेल्या प्रियकराच्या मदतीने भावाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी धमकावणे सुरू केले. या प्रकारात हा तरुण तणातवात होता. त्याने या तणावातून आत्महत्या केली. दरम्यान, या तरुणाने आत्महत्येपुर्वी चिठ्ठी लिहली आहे. त्यावरून येथील क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून तो तणावाखाली होता
किशोर सहा वर्षांपासून औरंगाबादेत एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. त्याचे आईवडील गावाकडे राहतात. मोठा भाऊ विकास हा पुण्याला नोकरी करतो, तर लहान भाऊ शिक्षण घेत आहे. किशोर शहरातील बाबा पेट्रोलपंप चौकातील म्हाडा कॉलनी परिसरात राहत होता. तो रोज अभ्यासिकेत जात होता. मात्र, मागील काही दिवसांपासून तो तणावाखाली होता. २९ सप्टेंबर रोजी महिनाभरापूर्वीच खोलीवर नव्याने राहण्यासाठी आलेल्या दोन मित्रांसोबत त्याने बराच वेळ गप्पा मारल्या. बाहेर जेवण्यासाठी जायची इच्छा असल्याचे बोलून दाखवले. मात्र, ३० सप्टेंबर रोजी सकाळी खोलीच्या गच्चीवर जात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्याच्या खिशात चिठ्ठी आढळून आली
या घटनेची चौकशी करताना पोलिसांना त्याच्या खिशात चिठ्ठी आढळून आली. त्याचा मोठा भाऊ विकासने ती चिठ्ठी व २७ सप्टेंबर रोजी त्याने गावाकडील एका भावासोबत झालेल्या कॉलवरून त्याच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्याविरोधात तक्रार दिली. दरम्यान, या प्रकरणी मोठ्या भावाच्या तक्रारीवरून किशोरची मानलेली बहीण, तिच्या दोन मैत्रिणी, पोलीस असलेला कृष्णा, मित्र ज्ञानेश्वर पाटील, सचिन केकाण, शोएब व आर्यनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातील नेत्यांना तपास यंत्रणांकडून टार्गेट- नवाब मलिक