औरंगाबाद - एमआयडीसी परिसरात राजकीय संघटनेच्या कार्यकर्त्याने उद्योजकाला मारहाण केली आहे. याबाबतचे सीसीटीव्ही समोर आले आहे. काही महिन्यांमध्ये गुंडगिरी वाढल्याने उद्योग आणि व्यापार वाढीला मोठ्या प्रमाणात खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
..असे आहे प्रकरण -
रेल्वे स्टेशन एमआयडीसीतील भोगले ऑटोमोबाइल कंपनीत एका कामगाराने हँड वॉशचे रसायन पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. व्यवस्थापनाने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र या कारणावरून बाहेरील १० ते १५ गुंडांनी कारखान्यात घुसून कंपनीतील अधिकारी व संचालकास मारहाण केली. अगदी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर नेऊन ही मारहाण केली, हाणामारीचे छायाचित्रणही केले. या हल्लेखोराविरोधात व्यवस्थापनाने पोलिसात तक्रार देऊन सीसीटीव्ही फुटेज सादर केले. पोलिसांनी काही आरोपींना अटकही केली तर काही जण पळून गेले. याविरोधात काही जणांनी कंपनीचे संचालक व एच. आर. विभागाविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेचा सर्व संघटनांनी निषेध केला.
यावर वेळीच उपाय करण्याची आवश्यकता आहे, याकडे 'टीम ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन' या उद्योजकांच्या संघटनेसह व्यापारी पेट्रोल, ऑटोमोबाइल आणि अन्य व्यावसायिकांच्या संघटनांनी एकत्र येऊन याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. 'सीएमआयए'च्या मुख्यालयात उद्योग, व्यापारी संघटनांची बैठक पार पडली. या वेळी सीआयआयचे रमण आजगावकर, मसिआचे उपाध्यक्ष अनिल पाटील, औरंगाबाद फर्स्टचे प्रीतीश चटर्जी, व्यापारी महासंघाचे सचिव लक्ष्मीनारायण राठी, पेट्रोल असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास, ऑटोमोबाइल असोसिएशनचे संदेश छाबडा, मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशनचे डॉ. हिमांशू गुप्ता आदींची उपस्थिती होती. वेळीच याला आळा घाातला नाही तर उद्योग आणि व्यवसाय बंद होतील असा इशारा उद्योजक राम भोगले यांनी दिला.